Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्य कट्टा

जागर स्त्री शक्तीचा

ॐ कार सगुण रुप
शक्तिपीठे साडेतीन
साकार रुपी प्रकटे
प्रणव जो अंतर्लिन

अ कार पीठ माहूर
उ कार तुळजापूर
म कार ते कोल्हापूर
अर्धमात्रा सप्तश्रृंगी

पार्वती गौरी भवानी
जगदंबा आणि उमा
प्रसन्न हास्य वदनी
दे आशीर्वाद आम्हा

दुर्गा भैरवी चामुंडा
काली माता आणि चंडी
भक्तांचे रक्षण करी
भवसागराच्या रणी

या स्त्रीरुपी कर्तृत्वाचा
करू सत्कारे जागर
अश्विन नवरात्रीचा
कृतज्ञतेचा सागर

मिलाफ शिवशक्तीचा
नारीच्या ठायी वसला
अधर्माला निर्दालूनी
दुष्टा वचक बसला

घटस्थापनेला होते
नवधान्यांची पेरणी
दसरा दिनी अर्पिती
अंकुर देवी चरणी

नारी अन् धरित्रीचा
शारदिय नवोत्सव
कृषी संस्कृती सांधते
स्त्री जन्माचा महोत्सव

सौ. स्वाती लेले
नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.