Press "Enter" to skip to content

आज पाचवी माळ !

शारदीय नवरात्र : पाचवी माळ

मूल अडीचतीन वर्षाचे झाले की रूढार्थाने औपचारिक शिक्षणाची सुरूवात होते. घरातील आई-आजी यांच्याशिवाय मग आपल्या आयुष्यात शिक्षिका नावाची आणखी एक मायाळू व्यक्ती प्रवेश करते.

बालवर्गाचा पहिला दिवस ही एक शैशवातील मोठी रोमांचक घटना असते. आपलं मूल शाळेत जाऊ लागणार या कल्पनेने घर-दार उल्हसित झालेलं असतं. सगळा जामानिमा करून बाळराजे किंवा राजकन्या तयार असतात. पण आईच्या पोटात गोळा उठलेला असतो. हाताचा पाळणा करून जोजवलेलं आपलं बाळ शाळेत कसं रमेल ? शिक्षिका कशा असतील? असंख्य प्रश्न तिच्या मनात पिंगा घालत असतात.

पहिल्यांदाच घरातून बाहेर पडून दुसर्‍या ठिकाणी बंद जागी बसावं लागल्याने बहुतेक सर्व मुले बावरून गेलेली असतात. कुणी मोठ्याने भोकाड पसरतं, तर कुणी पळून जायचा प्रयत्न करू लागतं. कुणी कोपर्‍यात जाऊन बसतं. अशा वेळी शिक्षिका आणि त्यांच्या मदतनीस यांचा कस लागतो. प्रत्येक मुलाला प्रेमाने समजवत, मायेने गोंजारत त्या हळूहळू शाळेत रूळवतात. गोड बोलून अभ्यास करून घेतात. मूल शाळेत रमून जातं आणि ही सरस्वती ज्ञानाची एक एक कवाडं उघडून मुलांना ज्ञानी करते. बोधकथा सांगून, राष्ट्रप्रेमाची गाणी शिकवून, चारित्र्यवान समाज घडवायचा प्रयत्न करते. प्रसंगी शाळेतील मुलांना वह्या पुस्तकांची मदत करणं, घरी अडचण असेल तर फी भरायला मदत करणं सुध्दा शिक्षिका करतात. गरीब पण हुशार मुलांना घरी बोलवून निःशुल्क शिकवतात. शाळेतील स्नेहसंमेलन, क्रिडा महोत्सव, सहल प्रत्येक ठिकाणी मुलांना त्यांच्या चैतन्याचा परीसस्पर्श लाभत असतो.

आताच्या जागतिक महामारीच्या काळातही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून या शारदेने अॉनलाईन शिक्षण देत ज्ञानयज्ञ अखंड सुरू ठेवला आहे. शिक्षिका फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत, चारित्र्यसंपन्न, सशक्त समाज घडविण्याचे महत्कार्य करतात. राष्ट्र उभारणीसाठी शिक्षिकांचा सिंहाचा वाटा असतो. तर अशा या सरस्वतीच्या चरणी दोन्ही हात जोडून नतमस्तक होऊया.

सौ. पौर्णिमा दीक्षित
सेक्टर १५-ए,नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.