Press "Enter" to skip to content

मुंबईत इराणमधून आलेले होते हेरॉईन ; एक आरोपी अटकेत

उरणमध्ये १२५ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त डीआरआयची मोठी कारवाई

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना रविवारी अटक केली. या प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणात उरणमधील जेएनपीटी बंदर परिसरातील एका यार्डमध्ये २५ किलो हेरॉईन सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकान छापा मारला असता, बंदरातील एका कंटेनरमधून हे ड्रग्स जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे १२५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

डीआरआयच्या मुंबई युनिटने बंदरावर छापा टाकल्यानंतर नवी मुंबईतील ६२ वर्षीय व्यापारी जयेश सांघवीला अटक केली आहे. सांघवीवर इराणमधून शेंगदाणा तेलाच्या एका खेपेमध्ये हेरॉईन लपवून मुंबईत आणल्याचा आरोप आहे. डीआरआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती की, मुंबईच्या न्हावा शेवा बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणला जात आहे. या माहितीच्या आधारे आम्ही छापा मारला आणि ही कारवाई केली असल्याचे सांगितले.

कंटेनर ऑर्डर करणाऱ्याचीही फसवणूक झाली

डीआरआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कंटेनर वैभव एंटरप्रायजेसचे संदीप ठक्कर यांनी आयात केलं होतं. डीआरआय टीमने त्याचीही चौकशी केली. चौकशीदरम्यान, ठक्करने डीआरआयला सांगितले की, संघवीने त्याला त्याच्या फर्मच्या आयईसीमध्ये इराणमधून वस्तू आयात करण्यासाठी १०,००० रुपये प्रति माल पाठवण्याची ऑफर दिली होती. तो १५ वर्षांपासून संघवीसोबत व्यवसाय करत होता, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून हा माल आणण्याची परवानगी दिली. ठक्करलाही यात ड्रग्स आणत असल्याची माहिती नव्हती.

आरोपी डीआरआयच्या ताब्यात
डीआरआयने सांघवीला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स ऍक्ट (NDPS) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला गुरुवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ११ ऑक्टोबरपर्यंत डीआरआय कोठडी सुनावली आहे. सांघवीच्या अटकेनंतर, आता डीआरआय टीम जेएनपीटी बंदरावर उपस्थित असलेल्या इतर काही कंटेनरचा शोध घेत आहे. सदर हेरॉईन जेएनपीटी बंदरातील कुठल्या यार्डमध्ये सापडले याची अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही.

अभिनेता शाहरुख खान यांचास मुलगा आर्यनला या अमली पदार्थांच्या सेवन प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर एकामागोमाग अमली पदार्थांचे साठे सापडू लागले आहेत. जेएनपीटी बंदराच्या परिसरातील यार्डमध्ये १२५ कोटींचा हेरॉईन पकडण्यात आले आहे. यामध्येही आर्यन खानचा सहभाग असावा अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे समजते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.