Press "Enter" to skip to content

अकरावी प्रवेशावेळी प्रमाणपत्रांसाठी ६ महिने मुदतवाढ द्या

आमदार निरंजन डावखरे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली मागणी

सिटी बेल लाइव्ह / अलिबाग (प्रतिनिधी) :

अकरावी ऑनलाईन प्रवेशअर्जावेळी आवश्यक करण्यात आलेला विद्यार्थ्याचा जातीचा दाखला, अधिवास आणि नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. 

कोरोनाच्या संसर्गाने लागू केलेला लॉकडाऊन शिथिल होत असतानाच, अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पार्ट १ भरताना विद्यार्थ्याचा स्वत:चा जातीचा दाखला, विद्यार्थ्याचे महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र व उन्नत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमीलेयर) प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य केले आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता संबंधित कागदपत्रे जमा करताना विद्यार्थी व पालकांची धावपळ उडणार आहे. तहसिल कार्यालयाशी संलग्न सेतू कार्यालयातून संबंधित कागदपत्रे मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो. कोरोनाच्या आपत्तीत महसूल विभागाचे बहूसंख्य कर्मचारी आपत्कालीन व्यवस्थेसाठी कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यास मर्यादा येतील. त्याचबरोबर या प्रमाणपत्रांसाठी तहसील कार्यालयात गर्दी उसळण्याची भीती आहे, याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे लक्ष वेधले आहे. 

या पार्श्वभूमीवर जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्राशिवाय नियमांच्या अधीन राहून अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी. तसेच संबंधित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दाखल करण्यासाठी सहा महिन्यांची अट ठेवावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.