Press "Enter" to skip to content

स्वातंत्र्य दिन कसा साजरा कराल ! केंद्राच्या सुचना

सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली #

देशातील कोरोना संकटाचा प्रादुर्भाव पाहता यावर्षी चा स्वातंत्रदिन देशभरात मर्यादित प्रतिबंधाखालीच साजरा होईल. मात्र यंदाचा हा राष्ट्रीय सोहळा कोरोना योद्ध्यांना समर्पित असेल. या कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून देशभरात स्वातंत्रदिन कसा साजरा करायचा यासाठीच्या मार्गदर्शक सूचना केंद्राने जारी केल्या. कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्याची सूचनाही सरकारने केली आहे.

स्वातंत्र्यदिनासाठीच्या मार्गदर्शक सूचना केंद्राने सर्व राज्य सरकारे, राज्यपाल तसेच सरकारी कार्यालयांना पाठविल्या आहेत. यामध्ये कोरोनाचा उपद्रव जाणवू नये यासाठी सार्वजनिक गर्दीचे कार्यक्रम टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तंत्रज्ञानाचा वापर करून स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा केला जावा. वेब कास्टद्वारे कार्यक्रमाचे प्रक्षेपणही शक्य आहे, असे सांगण्यात आले आहे. केवळ राज्य किंवा जिल्हा स्तरावरीलच नव्हे तर तालुका पातळीवरही स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यात लहान मुलांना, शालेय विद्यार्थ्यांना गर्दीच्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यास, त्याचप्रमाणे प्राधान्याने वेगवेगळ्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत योजनेला प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोरोना संक्रमण टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नियम पालन आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

लाल किल्ल्यावरील सोहळा
दिल्लीमध्ये देखील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यांना मानवंदना दिली जाईल. पंतप्रधानांचे भाषणही होईल. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी या कार्यक्रमासाठी निमंत्रितांची गर्दी नसेल. लाल किल्ल्यावर सकाळी नऊला पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. २१ तोफांची सलामी आणि सैन्यदल आणि दिल्ली पोलिसांतर्फे मानवंदना दिली जाईल. प्रथेप्रमाणे पंतप्रधानांचे भाषणही होईल. मात्र विद्यार्थ्यांचा सहभाग नसेल. निवडक मान्यवरांनाच निमंत्रित केले जाईल.

त्यातही कोरोना विरुद्धच्या लढाईत अग्रेसर असलेले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांना बोलावले जाईल. या कार्यक्रमासाठीची आसन व्यवस्थाही सुरक्षित अंतराच्या निकषानुसारच असेल. तर, राष्ट्रपती भवनात होणाऱ्या अॅट होम कार्यक्रमामध्येही सुरक्षा अंतराच्या नियमावलीचे कटाक्षाने पालन केले जाईल.

या आहेत सूचना

सुरक्षित अंतर, मास्क, निर्जंतुकीकरण या उपाययोजनांचा अवलंब.


गर्दी होऊ नये याची काळजी घेतली जावी.


राज्यांनीही स्वातंत्र्यदिनी गर्दी होईल असे कार्यक्रम घेणे टाळावे.


डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी या कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे कार्यक्रम आवर्जून करावे.


कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या रुग्णांनाही सहभागी करावे.


कार्यक्रमांचा सोशल मिडिया, डिजिटल स्क्रीनद्वारे प्रसार केला जावा

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.