Press "Enter" to skip to content

मुंबई गोवा महामार्गाचा खासदार सुनील तटकरेंनी घेतला आढावा

विद्यार्थ्यांसाठी उड्डाण पूल व चिकणीतील महामार्गाच्या समस्या लागणार मार्गी

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :

रायगडचे खासदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गातील नागोठण्यातील रस्त्याचा आज आढावा घेतला. आजच्या या पाहणी दौऱ्यात खा. तटकरे यांनी नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उड्डाण पूल व चिकणी गावाच्या हद्दीतील महामार्गाच्या समस्या मार्गी लावण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

खा. सुनील तटकरे यांच्या नागोठण्यातील या पाहणी दौऱ्याच्या वेळी आ. अनिकेतभाई तटकरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्रशांत हेगडे, कार्यकारी अभियंता अग्रवाल, राष्ट्रवादीचे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, विलास चौलकर, सुधाकर जवके, सचिन कळसकर, अशोक भोसले, बाळकृष्ण देवरे, सुरेश देवरे, दीपेंद्र आवाद, केतन भोय आदींसह चिकणी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे महामार्गावर वाहनांची संख्या व वेगही वाढणार असल्याने कोकण एज्युकेशन सोसायटीच्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात इयत्ता पहिली ते पदुत्तर शिक्षण घेणाऱ्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडतांना त्रास होणार आहे. त्यासाठी या ठिकाणी असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाला जोडूनच महामार्गावर नव्याने उड्डाणपूल उभारण्यात यावा असे निवेदन यापूर्वीच देशपांडे विद्यासंकुलाचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन यांनी खा. सुनील तटकरे यांच्याकडे दिले होते. त्यामुळे आजच्या आपल्या नियोजित पाहणी दौऱ्यात खा. तटकरे यांनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ थांबून पाहणी केली व या ठिकाणी तातडीने उड्डाण पूल उभारण्याचे आदेश प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे व कार्यकारी अभियंता अग्रवाल यांना दिले. हे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल याची हमीही खा. तटकरेंना उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

याशिवाय चिकणी गावाच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नागोठणेकडे जाण्यासाठी मिड ओपनिंग करणे, रेल्वेच्या भरावामुळे दरवर्षी पावसाळ्यात रस्ता पाण्याखाली जात असल्याने त्याचे डांबरीकारण उखडले जात असल्याने या अंतरात आर.सी.सी. चा रस्ता तयार करणे, या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी या ठिकाणी मोऱ्यांचे सुयोग्य नियोजन करणे अशा अनेक समस्या यावेळी चिकणीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पाटणसई ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन कळसकर यांनी खा. सुनील तटकरेंच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावेळी या ठिकाणीही तातडीची उपाय योजना करण्यात यावी असे आदेश खा. तटकरे यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिले.

त्यामुळे नागोठण्यातील महत्वाचे दोन प्रश्न मार्गी लागणार असल्याने नागरिकांतून आनंद व्यक्त करण्यात येत असून त्यांनी खासदार सुनील तटकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.