Press "Enter" to skip to content

ओरीजनल मुन्नाभाई एमबीबीएस सापडला : ठोकल्या बेड्या !

सिटी बेल लाइव्ह / अमरावती : 

संजय दत्त चा मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट आपण पाहिला असेलच आजही असे अनेक बोगस डॉक्टर भारतात आहेत त्यातलाच एक मुन्नाभाई अमरावती पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

गंभीर आजारावर कोणतीही शस्त्रक्रिया न करता रुग्णांना बरे करण्याचा दावा करणारा तोतया एम.बी.बी.एस. करीत होता. एम.डी. डॉ. अविनाश वसंत डबले असे नाव लावणाऱ्या या महाभागाचे केवळ बारावीपर्यंतच शिक्षण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्याच्या घराची पोलिसांनी रविवारी झडती घेतली. यावेळी या ठिकाणावरून पोलिसांनी बनावट दस्तऐवज, शिक्के, ओळखपत्र जप्त केले.

तोतया डॉ. अविनाश वसंत डबले याने शहरात आधी शांतिनगर बेनोडा व नंतर किरणनगर नं. 2 येथे आठ बेडचे रुग्णालय सुरू केले. त्यापूर्वी अविनाश डबले हा अमरावती, यवतमाळ व नागपूर येथील काही डॉक्‍टरांच्या खासगी रुग्णालयात मदतनीस म्हणून काम करीत होता.त्याने वैद्यकीय क्षेत्रातील बारकावे मोठ्या प्रमाणात समजावून घेतले. या व्यवसायात येणारा पैसा त्याच्या डोळ्यांपुढे दिसू लागला. अन्‌ त्याने स्वत:च डॉक्‍टर म्हणून पुढे येण्याचे ठरविले. त्यासाठी नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातून 2004 साली एमबीबीएस, एम.डी.पर्यंत शिक्षण पूर्ण करून पदवी प्राप्त केल्याची बतावणी तो करू लागला.

शिवाय सीएमई फाउंडेशन मुंबई येथील सदस्य असल्याचे ओळखपत्रही त्याच्या भवते ले-आउट परिसरातील घरात पोलिसांना आढळले तेही पोलिसांनी जप्त केले.

आधी शांतिनगर बेनोडा येथे एक वर्षापेक्षा अधिक काळपर्यंत रुग्णालय चालविले. तेथे डबले याने त्याच्या रुग्णालयात रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, अस्थमा, अर्धांगवायू, क्षयरोगावर उपचार केले जात असल्याचे मोठ्या फलकावर नमूद केले होते. हे उपचार त्याने एकाही रुग्णावर शस्त्रकिया न करताच केल्याचा दावा केला. तो मंगळवारपर्यंत फ्रेजरपुरा पोलिसांच्या कोठडीत आहे.

रुग्णालयात काम करणाऱ्यांची चौकशी

तोतया एम.डी. डॉक्‍टरच्या रुग्णालयात दोन परिचारिका तर एक युवक मदतनीस म्हणून कामाला होते. त्या तिघांचे जबाब पोलीस नोंदवित आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.