Press "Enter" to skip to content

भूमिपुत्रांच्या मानवी साखळीला प्रचंड यश !

आंदोलनाची पहिली जोरदार पायरी यशस्वी : दि बा साहेबांसाठी उभी राहिली मानवतेची साखळी

दिबांच्या नावासाठी संघर्षाची जोरदार तयारी : २४ जून सिडको घेरावाचीही जय्यत तयारी

सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे आणि त्यासाठी सरकारचे लक्ष केंद्रित झाले पाहिजे याकरिता रायगड ते मुंबई अशी भव्य मानवी साखळी आंदोलन आज (दि. १० जून ) करण्यात आले. ‘हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते, वाया जाऊ द्यायचे नसते’ आणि ‘संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही’ हे प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे वचन घेऊन हे आंदोलन झाले. दिबांच्या नावासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल, त्यासाठी आम्ही तयार आहोत अशीच भूमिका या आंदोलनात पहायला मिळाली. पनवेल मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते सीबीडी बेलापूर अशी तब्बल १२ किमी अंतराची मानवी साखळी बघताना हि दिबांसाठी मानवतेची साखळी असल्याचे अधोरेखित झाले.

रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात एकूण जवळपास २०० किमी अंतराची मानवी साखळी उभारण्यात आली होती. यामध्ये जवळपास ४० हजारहुन जास्त जणांनी सहभाग घेऊन मानवी साखळीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून झालेल्या या आंदोलनात कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली. या मानवी साखळीत म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जे. डी. तांडेल, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल घरत, माजी उपमहापौर चारुशिला घरत, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, शेकडो संघटना, वारकरी संप्रदाय, कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध पक्षांचे कार्यकर्ते, हजारो नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी ‘विमानतळाला दिबासाहेबांचेच हवे नाव’ अशी गर्जना करताना दिबासाहेब झिंदाबाद, दिबासाहेब अमर रहे, अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. कोविड संदर्भातील सर्व नियम पाळून हे आंदोलन झाले.

हवामान खात्याने अतिवृष्टीचा ईशारा दिला होता. त्या अनुषंगाने तसे पडसादही होते मात्र निसर्गसृष्टीला सुद्धा दिबासाहेबांचेच नाव मान्य असल्याने आंदोलकांना पावसाची बाधा पोहचु नये यासाठी वरुणराजाने विश्रांती घेत आंदोलनाला साथ दिली. मानवी साखळीत दिबांचे चित्र असलेले मास्क आणि रक्तररंजित झेंडे, बॅनर, हॅन्ड होर्डिंग्ज लक्षणीय होते. एकूणच या आंदोलनातून २४ जूनला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी सिडकोला घेराव घालण्याची पूर्वतयारीही दिसत होती आणि जो पर्यंत दिबांचे नाव नाही तो पर्यंत संघर्ष कायम असल्याचा निश्चय स्पष्ट दिसून आला.


गगनभेदी मागणी

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता आणि राजकीय पक्षाचे नेते करीत आले आहेत. कारण दि. बा. पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. इथल्या भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. १९८४ साली शेतकऱ्यांच्या जमितीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व देशभर गाजलेल्या शौर्यशाली लढ्यातून शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याचे तत्त्व जे प्रस्थापित झाले ते पुढे संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले. त्यामुळे दि. बा. पाटील हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते होते. पाचवेळा आमदार, दोन वेळा खासदार, विरोधी पक्षनेते, नगराध्यक्ष अशी दमदार कारकीर्द कामगिरी दि. बा. पाटील यांची राहिली आहे. आपल्या बुलंद आवाजाने महाराष्ट्र विधीमंडळात तसेच खासदार म्हणून दिल्लीच्या सार्वभौम संसदेत शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा प्रश्न अशा अनेक जनलढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेऊन तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य नव्या पिढीला स्फूर्तिदायी ठरावे यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागरूक राहावी यासाठी नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, अशी मागणी विविध पक्षांच्या नेत्यांनी सामाजिक संघटनांनी तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली असून राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी गगनभेदी मागणी या मानवी साखळी आंदोलनातून केली.

यावेळी बोलताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले कि, लोकनेते दि. बा. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्व समाजासाठी खर्च केले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी प्रकल्पग्रस्त, शेतकरी, स्थानिक, बहुजन समाजासाठी संघर्ष केला. त्यांच्या संघर्षातून साडेबारा आणि साडेबावीस टक्के आणि अनेक निर्णय प्रस्थापित झाले आणि त्याचा फायदा शेतकरी, प्रकल्पग्रस्त, सर्वसामान्य माणसाला झाला. सरकार कुठलेही असो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील साहेबांचेच नाव दिले पाहिजे हि आमची कायम भूमिका राहणार आहे. भूमिपुत्राला, शेतकऱ्याला त्याचे हक्क मिळवून देण्याचे अधिकार दिबांमुळे मिळाला. संघर्ष करत करत त्यांनी सर्व भूमिपुत्र शेतकरी, प्रकल्पग्रस्तांना जगायला शिकवले. दिबासाहेब महारष्ट्रातील भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त आम्हा सर्वांची अस्मिता आहे, त्यामुळे दिबासाहेबांचे नाव विमानतळाला दिलेच पाहिजे त्यासाठी आम्ही वाटेल किंमत मोजायला तयार असून २४ जूनला सिडकोला घेराव घालणारच आहोत पण त्यापुढेही वेळ पडल्यास आणखी संघर्ष करायला तयार आहोत, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आवर्जून नमूद केले. विविध समाज, पक्ष, संस्था-संघटना, पत्रकार, यांनीही पाठींबा दिला असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक आगरी पुढाऱ्यांनी दिबांच्या नावाला विरोध केल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना सांगितले कि, नवी मुंबई विमानतळाला दिबासाहेबांचे नाव द्यावे यासाठी सभागृहात लावण्यात आलेल्या अभियान बॅनरवर महाविकास आघाडीतील स्थानिक पुढाऱ्यांनी स्वाक्षरी केली होती. पण त्यांची अचानकपणे भूमिका बदलली आणि या स्वार्थी पुढाऱ्यांचे त्यानिमित्त समाजासमोर पितळ उघडे झाले आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

दि बा साहेबांचे नाव विमानतळाला दिल्यास मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आजचे मानवी साखळी आंदोलन प्रशासनाला जाग येण्यासाठी हे पहिले पाऊल असून प्रकल्पग्रस्तांचे ०१ लाख लोकं १० लाख लोकांवर भारी पडतील, असा ईशाराही यावेळी त्यांनी प्रशासनाला दिला.

यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना म्हंटले कि, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिलेच पाहिजे हि आमची प्रमुख मागणी आहे. आणि यासाठी भूमिपुत्र स्थानिक माणूस, प्रकल्पग्रस्त एकवटलेला आहे. आणि तशी २०१२ सालापासून सगळ्यांची हि मागणी आहे. आणि असे असताना अचानकपणे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे स्व. बाळासाहेबांचे नाव रेटत आहेत. बाळासाहेबांबद्दल सर्वाना आदर आहे, समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव दिले गेले आहे.महाराष्ट्रातील इतर मोठ्या प्रकल्पालाही देता येऊ शकते. लोकनेते दि. बा. पाटील साहेब येथील भूमीपुत्र आहे, हि त्यांची जन्मूभूमी कर्मभूमी आहे आणि म्हणून त्यांचे नाव येथील विमानतळाला देणे गरजेचे आहे. भाजप, आरपीआय प्रत्यक्षपणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. या मानवी साखळीत सर्व पक्षाचे नेते नसतील पण ज्यांना दिबासाहेबांबद्दल आस्था आहे असे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवर्जून उल्लेख केला. एकूणच दिबासाहेबांसाठी सर्वोत्तपरी प्रयत्न आणि संघर्ष करण्यास आम्ही कायम तयार आहोत, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.