Press "Enter" to skip to content

सर्वपक्षीय कृती समितीला नाना पटोले यांचे आश्वासन

नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार !

सिटी बेल । मुंबई । प्रतिनिधी ।

लोकनेते दि. बा. पाटील हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते. ओबीसी समाजासाठी त्यांनी केलेले काम अतुलनीय असेच आहे. आमच्या पिढीचे ते आदर्श होते. त्यामुळे त्यांचे नाव नवी मुंबईतील विमानतळाला देण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपल्या सर्वपक्षीय कृती समितीची त्यांच्याशी भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन `महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीला दिले.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आला आहे. यासाठी रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर यांसह अनेक जिल्ह्यांत मोठी चळवळ उभी राहात आहे. त्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या एका शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातले एक निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी पटोले यांनी या शिष्टमंडळाला आश्वासित केले.

कृती समितीचे अध्यक्ष, शेतकरी नेते दशरथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भेटलेल्या या शिष्टमंडळात कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कार्यकारिणी सदस्य उद्योजक जे. एम. म्हात्रे, ओबीसी नेते जे. डी. तांडेल, कृती समितीचे सहचिटणीस दीपक म्हात्रे, संतोष केणे, मेघनाथ म्हात्रे आणि जासई ग्रामस्थांचे प्रतिनिधी आदींचा समावेश होता.

या शिष्टमंडळाने नाना पटोले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकनेते दि. बा. पाटील यांची नवी मुंबई, रायगड ही कर्मभूमी आहे. इथल्या भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले सबंध आयुष्य वेचले आहे. 1984 साली शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा, यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व साऱ्या देशभर गाजलेल्या शौर्यशाली लढ्यातील शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याचे तत्त्व प्रस्थापित झाले. पुढे ते महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पग्रस्तांना लागू झाले.

दि. बा. पाटील यांनी महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी भरपूर काम केले आहे. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी व त्यानंतरही ओबीसी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी दि. बा. पाटील यांनी महाराष्ट्रभर दौरे केले. अशा या लोकोत्तर नेत्याचे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देणेच योग्य आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.