Press "Enter" to skip to content

उद्या बुद्ध पौर्णिमेला दिसेल “ब्लड रेड सुपरमून” व “चंद्रग्रहण”

उद्या दिसणार अवकाशात ब्लड सुपरमून

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

बुधवारी ता.२६ मे रोजी अवकाशात ब्लड रेड सुपरमून व चंद्रग्रहण अश्या दोन खगोलीय घटना अवकाश प्रेमींना पाहायला मिळतील. या दिवशी चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ५७ हजार ३११ किलोमीटर अंतरावर येणार आहे. या दिवशीचे चंद्रबिंब नेहमीपेक्षा मोठे म्हणजेच १४ टक्के मोठे व ३० टक्के अधिक तेजस्वी दिसेल.

२६ तारखेला संध्याकाळी ७ वाजून ८ मि. ते ७ वाजून १९ मि. पर्यंत अंशतः चंद्रग्रहण व संपूर्ण रात्रभर सुपरमून पहायला मिळेल, अशी माहिती ग्लोबल मिशन ॲस्ट्रोनोमी अँड रिसर्च सेंटर चे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांनी दिली.

सुपरमून म्हणजे काय ?

चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लाख ८४ हजार किलोमीटर इतक्या अंतरावर असतो. पण, चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने भ्रमण करीत असल्यामुळे कधी पृथ्वीच्या जवळ (perigee) तर कधी दूर (apogee) जातो. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात कमी अंतरावर येतो तेव्हां त्या घटनेला सुपरमून असे म्हंटले जाते. अश्या स्थितीत चंद्र नेहमीपेक्षा आकाराने मोठा व तेजस्वी दिसतो. वर्षातून काहीवेळा अश्या खगोलीय घटना घडत असतात. असे कुंभारे यांनी दिली.

सर्वप्रथम १९७९ मध्ये पृथ्वीजवळ आलेल्या पौर्णिमेच्या चंद्राला रिचर्ड नोले यांनी सुपरमून असे नाव दिले.

बुधवारी होणाऱ्या चंद्रग्रहणाला ब्लड रेड मून असेही म्हटले जाते. कारण या चंद्रग्रहणादरम्यान चंद्र लाल रंगात दिसणार आहे.

जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेंव्हा चंद्रग्रहण होते. चंद्रग्रहण सुरु झाल्यानंतर सर्वात आधी चंद्र काळ्या रंगाचा दिसेल, त्यानंतर हळूहळू चंद्र लालसर रंगाचा दिसेल. याला ‘ब्लड रेड मून’ म्हंटले जाते.

चंद्रग्रहण किती वेळ दिसेल ?

विशाल कुंभारेंनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेप्रमाणे दुपारी २.१७ मि. ग्रहण सुरु होणार आहे. तसेच पूर्ण चंद्रग्रहण दुपारी ४.४१ मि. ते ४.४८ मि.पर्यंत असणार आहे. तसेच चंद्रग्रहण ७.१९ मि. संपणार आहे.

पुणे मधून ग्रहण चंद्रोदयापासून म्हणजे संध्याकाळी ७ वाजून ८ मि. सुरुवात होईल व ग्रहण ७ वाजून १९ मि. संपेल म्हणजे ११ मिनिटे अंशतः चंद्रग्रहण पहायला मिळेल, असे कुंभारे यांनी सांगितले.

कुठे दिसणार चंद्रग्रहण ?

चंद्रग्रहण दक्षिण/पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिकेतील बहुतांश भागांत, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, अटलांटिक, हिंद महासागर आणि अंटार्क्टिकामध्ये दिसणार आहे. काही शहरांमध्ये खग्रास (पूर्ण) चंद्रग्रहण दिसण्याची शक्यता आहे. यामध्ये होनोलूलू, ह्यूस्टन, लॉस एंजिल्स, मनीला, मेलबर्न, सॅन फ्रांसिस्को, सियोल, शांघाई आणि टोकियोचा समावेश आहे. तसेच बँकॉक, शिकागो, ढाका, मॉन्ट्रियल, न्यूयॉर्क, टोरंटो आणि यांगून यांसारख्या शहरांमध्ये चंद्रग्रहण अंशिक स्वरुपात दिसून येईल. दरम्यान, भारतात मात्र पेनुम्ब्रल (अंशतः) चंद्रग्रहण पाहता येणार आहे.

कसे पाहता येणार चंद्रग्रहण व सुपरमून ?

चंद्रग्रहण व सुपरमून पाहण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची आवश्यकता लागत नाही. दुर्बीण अथवा टेलिस्कोप असेल तर उत्तम. आपण आपल्या घराच्या अंगणातून, बाल्कनी किंवा टेरेसवरून देखील पाहू शकतो.

या वर्षीच्या ३ सुपरमून पैकी हा दुसरा सुपरमून असेल, त्यातील पहिला २६-२७ एप्रिल ला व तिसरा आणि या वर्षातील शेवटचा सुपरमून २४ जून ला दिसेल.

जगभरातील खगोलप्रेमींना या दिवशी रेड ब्लड सुपरमून व चंद्रग्रहणाचे नयनरम्य दृश्य अनुभवता येईल. सर्वांनी हा सुपरमून व ग्रहण पहावे व खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा असे शेवटी आवाहन खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.