Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी पुन्हा ! केरळच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपद

सिटी बेल । तिरूअनंतपुरम ।

 केरळ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा डाव्यांनी सत्ता स्थापन केली आहे. या विजयानंतर 18 दिवसांनी म्हणजेच आज गुरूवारी पी. विजयन यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विजयन हे 76 वर्षांचे असून मागील 40 वर्षांत पहिल्यांदाच सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या मंत्रीमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसलाही एक मंत्रीपद मिळाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल स्टेडियममध्ये छोटेखानी कायर्क्रमात केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी पी. विजयन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.विजयन यांच्यासह 20 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. कोरोनाचे कारण देत विरोधी पक्षातील नेते या शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत.

विजयन यांच्या मंत्रीमंडळामध्ये दोन मंत्री वगळता सर्व चेहरे नवीन आहेत. दोन दिवसांपूर्वीच कम्युनिस्ट पक्षाने मागील मंत्रीमंडळातील एकाही आमदाराला पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज शपथ घेतलेल्या 20 जणांमध्ये डाव्या पक्षातील एकाही जुन्या मंत्र्याचा समावेश नाहीये. या मंत्रीमंडळात केवळ जेडीएसचे नेते के. कृष्णनकुट्टी आणि राष्ट्रवादीचे नेते ए. के. शशीधरन यांचाच समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शशीधरन आणि विजयन यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

शशिधरन हे मागील सरकारमध्ये जलसंधारण व परिवहनमंत्री राहिले होते. केरळमधील राष्ट्रवादी पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत. केरळमध्ये राष्ट्रवादीला यावेळी दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये शशीधरन यांच्यासह थॉमस के थॉमस यांचा समावेश आहे. मागील काही वर्षांपासून राष्ट्रवादीची केरळमध्ये डाव्यांसोबत आघाडी आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.