Press "Enter" to skip to content

सोन्याचे बनावट शिक्के देवून फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी गजाआड

रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आवळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या

सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन ।

रायगड जिल्हयातील मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे तक्रारदार यांना आरोपीत यांनी ओरीजनल सोन्याचे शिक्के खोदकाम करताना सापडले आहेत त्यांना पैशांची खुप गरज असून ती विकायची आहेत, असा खोटा बहाणा करून तक्रारदार यांना हातचलाखी करून त्यांचेकडून 65 लाख रूपयांच्या बदल्यात त्यांना पितळी धातुचे शिक्के देवून त्यांची फसवणूक केलेबाबत दोन अनोळखी पुरूष व एक अनोळखी महिला यांचे विरूध्द मांडवा सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.09/2021, भा.द.वि.सं.कलम 420,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नमुद गुन्हयाची तीव्रता पाहाता रायगड जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग यांना आदेशीत केले होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड-अलिबाग येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक .दयानंद गावडे, यांनी पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक तपास पथक तात्काळ तयार करून नमुद स्वरूपाचे गुन्हे करणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा व त्यांच्या टोळयांचा शोध घेण्यास सुरूवात केली. सदर शोध घेत असताना तपास पथकातील पोलिस हवालदार अमोल हंबीर यांनी गोपनीय माहिती प्राप्त करून सदरचे गुन्हे करणारे आरोपीत हे गुजरात राज्यातील वडोदरा, वलसाड भागात असल्याचे निष्पन्न केले.

त्याप्रमाणे सपोनि धनंजय पोरे, सपोनि युवराज खाडे व पोउनि सचिन निकाळजे व त्यांचे तपास पथकाने पोलिस हवालदार अमोल हंबीर यांच्या प्राप्त माहिती प्रमाणे 10 दिवस गुजरात राज्यातील वडोदरा वलसाड येथे राहून अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपीतांची माहिती प्राप्त केली. परंतु, सदर आरोपीत हे अत्यंत हुशार असल्याने ते एका ठिकाणी राहात नव्हते, तसेच त्यांचेविरूध्द तांत्रिक पुरावा सुध्दा उपलब्ध होत नव्हता. तरी देखील सदर तपास पथकाने निष्पन्न आरोपीतांचा शोध घेण्याचे प्रयत्न मागील एक महिन्यापासून चालुच ठेवले होते.

सदर तपास पथकाने नमुद आरोपीतांचा शोध घेवून आरोपीत नामे 1) प्रभुभाई गुलशनभाई सोलंकी उर्फ कल्पेश प्रजापती, वय 37 वर्षे, रा. बी/29, रा. बी/29, कल्याणनगर सोसायटी, आजवा रोड, जि.वडोदरा, राज्य गुजरात 2) मणिलाल नारायण राठोड उर्फ महेश प्रजापती, वय 52 वर्षे,रा.कारेलीबाग, जि.वडोदरा,राज्य गुजरात 3) अर्जुन भिकाभाई सोलंकी, वय 25 वर्षे, रा.डींडोली, जि.सुरत,राज्य गुजरात 4) लक्ष्मीदेवी शंकर गुजराती, वय 45 वर्षे,मुळ रा.692 सेक्टर नं.03,गांधीनगर, जि.भोपाळ,राज्य मध्यप्रदेश सध्या रा.खडव ली,पो.पडघा, जि.ठाणे आरोपीत क्रमांक 01 ते 03 यांना मजनगंज, जि.अजमेर, राज्य राजस्थान येथून तसेच आरोपीत नं.04 यांना खडवली, पडघा,जि.ठाणे येथून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

नमुद आरोपीत यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपीत नं.01 ते 03 यांना अटक करण्यात आले असून त्यांची दिनांक 22/04/2021 रोजीपर्यत पोलीस कोठडी मंजुर आहे.

आरोपीत यांचेकडून सपोनि श्धनंजय पोरे व त्यांचे तपास पथकाने तक्रारदार यांची फसवणूक केलेली रक्कम रूपये 65,00,000/- रोख हस्तगत केली असून सदर गुन्हा करताना आरोपीत यांनी वापरलेले वाहन 3,00,000/- रू. किंमतीची फोक्स वॅगन कंपनीची वेंटो कार क्र.एचएच/01/अेएक्स/3266 ही देखील जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग येथील सपोनि श्री.धनंजय पोरे हे करीत आहेत.सदर गुन्हयात आतापर्यत एकूण 68,00,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयात फसवणूक झालेली 100 टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
नमुद आरोपीत हे अशा प्रकारचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नाशिक, वर्धा, नागपूर तसेच मध्यप्रदेश, गुजरात,राजस्थान येथे केल्याचे सांगितले आहे.

सदर टोळीचा प्रमुख प्रभुभाई गुलशनभाई सोलंकी उर्फ कल्पेश प्रजापती हा असून ते निरनिराळी नावे धारण करून लोकांना कमी पैशांत ओरीजनल सोन्याचे शिक्के देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून मोठया रोख रक्कमा स्विकारून त्यांना ओरीजनल सोन्याएैवजी पितळी शिक्के देवून त्यांची फसवणूक करीत असतात.

सदरचा गुन्हा पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग, अपर पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग रायगड येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दयानंद गावडे, सपोनि धनंजय पोरे, सपोनि युवराज खाडे, पोसई सचिन निकाळजे, सहा.फौजदार चंद्रकांत पाटील, पोलिस हवालदार अमोल हंबीर,पोलिस हवालदा रप्रशांत दबडे, पोलिस हवालदार संजय धुपकर, पोलिस हवालदार स्वप्निल येरूणकर,पोलिस हवालदार देवरामकोरम,महिला पोलीस नाईक मारी संजिवनी म्हात्रे, पोलीस नाईक सुनिलकुमार खराटे ,महिला पोलीस शिपाई गाणार,महिला पोलीस शिपाई .जयश्री पळसकर यांनी गुन्हा उघडकीस आणणेकरीता उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.