Press "Enter" to skip to content

माथेरान नगरपरिषदेच्या दवाखान्यात रुग्णांना उत्तम सुविधा : नगराध्यक्षा प्रेरणा सावंत

सिटी बेल । माथेरान । मुकुंद रांजाणे ।

डोंगरावर वसलेल्या दुर्गम अशा निसर्गरम्य माथेरान मध्ये नगरपरिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या बी.जे.रुग्णालय या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना उत्तम प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत त्यामुळे सध्याच्या कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर नियंत्रण राखण्यासाठी या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी वर्ग प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत याकारणास्तव अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत.

रुग्णांना शुद्ध पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी दोन मशीन लावण्यात आल्या असून कोव्हीड रुग्ण आणि सर्वसामान्य रुग्ण यांच्यासाठी स्वतंत्र ओपीडी कक्ष करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केल्यामुळे इथे ओटू बेड उपलब्ध झाल्यामुळे याचा रुग्णांना लाभ होत आहे. बीजे रुग्णालय ही वास्तू हेरिटेज असल्यामुळे या दवाखान्याच्या दुरुस्ती करिता अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

याकामी नगरपरिषदेच्या वतीने शासनाला अनेकदा प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत सुरुवातीला अंदाजे दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला होता पुन्हा हेरिटेज पद्धतीने हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी साडेचार कोटी रुपयांची मागणी आम्ही एमएमआरडीए यांच्याकडे केली होती त्यांनी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्याबाबत नगरपरिषदेला पत्र दिले आहे.त्यामुळे या रक्कमेचा वापर अधिकाधिक चांगल्या प्रकारे दवाखान्यासाठी कसा करता येईल हा प्रयत्न राहणार आहे. तर सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सुध्दा या दवाखान्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

इथे ज्या मशिनरी आहेत त्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी रूमची आवश्यकता आहे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.अन्य ठिकाणांपेक्षा माथेरान मधील सर्वप्रकारच्या रुग्णांना उत्तम प्रकारे सुविधा दिल्या जात असल्याने एकंदरीतच नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे.असेही विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी सांगितले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.