Press "Enter" to skip to content

आठवणींनो

आठवणींनोऽऽऽ

आठवणींनो ,तुम्ही मागच्या दारी थांबा
माझ्या गाडीचा आलाय हा नवा थांबा
सांडलं,लवंडलं,तुटकं फुटकं
सगळं बाहेर ठेवून दिले
जुनीपुराणी कापडचिंधी
गरजूंना देऊन आले
आता ,साठवणींचा कप्पा भरायचा आहे
म्हणून सांगते आठवणींनो तुम्ही मागच्या दारी थांबा:!1!!
लोणच्याचा खार तळाला गेलाय
भाकरीच्या पिठाची विरी गेलीय
पण दोन्हींचे मिश्रण करून
चविष्ट थालीपीठ बनवायचे आहे
साठवणींचा कप्पा भरायचा आहे
आठवणींनो तुम्ही मागच्या दारी थांबा !!2!!
नवे वाळवण ,नवा मसाला
बरणीमध्ये नवा मुरांबा
मऊ खिचडी सोबत नूडल्स ही
आयुष्याच्या या पानावर चाखायची आहे
साठवणींचा कप्पा भरायचा आहे
आठवणींनो तुम्ही मागच्या दारी थांबा!!3!!
वृद्धत्वाच्या झुल्यावर मंद झोके घ्यायचे आहेत
थरथरत्या हाताला ,सुरकुतल्या मऊ हातानी
अलगद साथ करायची आहे
दुधाला धक्का न लावता ,सायीला जपायचे आहे
साठवणींचा कप्पा भरायचा आहे
आठवणींनो तुम्ही मागच्या दारी थांबा !!4!!
संसाराच्या निवृत्ती ला काठीचा आधार
पारंबीला न व्हावा झाडाचा भार
वरच्या सां ने वरून सा पकडून
सूर सुस्वर करायचा आहे
साठवणींचा कप्पा भरायचा आहे
*आठवणींनो, तुम्ही मागच्या दारी थांबा
माझ्या गाडीचा आलाय हा नवा *!थांबा* !!

सुषमा गोखले, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.