Press "Enter" to skip to content

माथेरानने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पाडला नवा पायंडा

एक ऐतिहासिक निर्णय : माथेरान मधील रस्त्याला मुख्याधिकारी रामदास कोकरेंचे नाव

सिटी बेल । मुकुंद रांजाणे । माथेरान ।

माथेरान मध्ये अवघ्या एकोणीस महिन्यांच्या कार्यकाळात एकंदरीतच या पर्यटनस्थळाचे रुपडे बदलून नवा आदर्श निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास तुकाराम कोकरे यांच्या प्रामाणिकपणे केलेल्या कार्याबद्दल येथील डंपिंग ग्राउंड मार्गाला सत्ताधारी शिवसेना गटाने “श्री रामदास तुकाराम कोकरे “असे नामकरण करण्यात आले आहे.

हे अनावरण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे माथेरान मधील आजवरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एका शासकीय अधिकारी वर्गाला हा बहुमान प्राप्त झाला आहे.

२०१६ च्या कालखंडात तत्कालीन मुख्याधिकारी सागर घोलप यांनी कायद्यावर बोट ठेऊन गावाच्या विकासाची दिशा थांबवली होती. त्यामुळे त्यावेळेस दोन वर्षांच्या काळात काहीच विकासकामे करणे मुश्कील बनले होते त्यानंतर रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी २३ जुलै २०१८ ते १३ फेब्रुवारी २०२० या कालावधीकरिता माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी रामदास कोकरें वर सोपविली होती त्यास उत्तम प्रकारे साथ देत या पदाचे चीज करत माथेरान सारख्या दुर्गम स्थळाचे हीत आणि स्थानिकांसह पर्यटकांना भेडसावत असणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते. स्वच्छता दूत म्हणून त्यांना संबोधले जाते.

यापूर्वी त्यांनी वेंगुर्ला आणि कर्जत येथील कचरा मुक्त डंपिंग ग्राउंडच्या यशस्वी प्रयोगानंतर माथेरान मध्ये सुद्धा ही संकल्पना यशस्वी केली आहे. इथल्या डंपिंग ग्राउंडचे खेळाच्या मैदानात रूपांतर करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच सत्ताधारी गटाने त्यांना ( कचरा मुक्त डंपिंग ग्राउंडचे जनक ) ही उपाधी दिली आहे.

माथेरानच्या पर्यावरण पूरक सर्वांगीण विकासात नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या कार्यकाळात रामदास कोकरेंनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांच्या या कार्याची दखल घेऊन डंपिंग ग्राउंड रस्त्याला “श्री रामदास तुकाराम कोकरे” असे नामकरण करण्यात आले आहे ही एका शासकीय अधिकाऱ्याच्या कामाची पोचपावती असल्याने नगरपरिषदेच्या कर्मचारी वर्गाने त्याचप्रमाणे माथेरान मधील नगरपरिषद गटनेते प्रसाद सावंत यांच्या सह लोकप्रतिनिधीनी तसेच हितचिंतकांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.