Press "Enter" to skip to content

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पनवेलच्या नृत्यआराधना कला निकेतन संस्थेची बाजी

शिष्यांनी पटकाविली अनेक पारितोषिके  गुरु दिपीका सराफ यांनी बेस्ट कोरिओग्राफर पुरस्कार  

सिटी बेल । पनवेल । प्रतिनिधी ।

अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ नागपूर, मेंबर ऑफ थे इंटरनॅशनल डान्स कौन्सिल सीआयडी पॅरिस-फ्रांस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड डान्सर ऑनलाईन इंटरनॅशनल डान्स कॉन्टेस्ट २०२१’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पनवेल येथील नृत्यआराधना कला निकेतन संस्थेच्या विद्यार्थिनींनी तसेच त्यांच्या प्रशिक्षकांनी नेत्रदिपक कामगिरी करून सुवर्णयश संपादन केले आहे.

या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजेत्यांचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक केले. यावेळी मनिष सराफ, सचिन सराफ, प्रशिक्षक गुरु दिपीका सराफ, अमिता सराफ आदी उपस्थित होते.  

ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, कॅनडा, जर्मनी, ओमान, युएई, सिंगापूर, मलेशिया, कतार, एकोडोर आदी देशातील  ४६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामधील ३०६ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती.

भरतनाट्यम, कथक, ओडिसी, कुचिपुडी, मोहिनी अट्टम, सेमी क्लासिकल, इंडियन फोक, बॉलिवूड, हिपहॉप आणि कंटेम्पररी आदी नृत्य प्रकारांचा समावेश होता.या स्पर्धेत  नृत्यआराधना कला निकेतन पनवेल संस्थेच्या संचालिका व प्रशिक्षक गुरु अँड. दीपिका मनीष सराफ आणि अमिता सचिन सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली या नृत्य संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत पनवेलमधील नृत्यआराधना कला निकेतन संस्थेने ‘समूह भरतनाट्यम सिनिअर गटात’ प्रथम क्रमांक, ‘भरतनाट्यम जोडी सिनिअर गटात’ प्रथम क्रमांक, ‘सेमी क्लासिकल लहान गटात’ तृतीय क्रमांक , ट्राओ सेमी क्लासिकल खुल्या गटात’ तृतीय क्रमांक, ‘सेमी क्लासिकल समूह लहान गटात’ द्वितीय क्रमांक पटकाविले तसेच प्रशिक्षक गुरु दिपीका सराफ यांनी बेस्ट कोरिओग्राफर पुरस्कारही जिंकत सुवर्णयश व अभिमानास्पद कामगिरी केली. 

नृत्यआराधना कला निकेतनच्यावतीने या स्पर्धेत ‘समूह भरतनाट्यम सिनिअर गटात’ प्रणिता वाघमारे, सई जोशी, वैखरी पोटे, श्रावणी थळे, नित्या पाटील, अवनी पवार, ‘भरतनाट्यम जोडी सिनिअर गटात’ तनया घरत आणि कोमल पाटील, ‘सेमी क्लासिकल एकेरी लहान गटात’ ओवी नायकल, ट्राओ सेमी क्लासिकल खुल्या गटात’ वैशाली पवार, निलम बोरडे, गौरी सातपुते, तर ‘सेमी क्लासिकल समूह लहान गटात’ ज्वेता सराफ, ऋतुजा पावसकर, मेह्क जोशी, ओवी नायकल, देवश्री झावरे, अदिती शेंडे, तन्वी पाटील, हर्षिता कुलकर्णी, मान्या दास यांनी सहभाग घेऊन पारितोषिके पटकाविली.

या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आणि नागरिकांडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  

नृत्य आराधना कलानिकेतन संस्था गेल्या नऊ वर्षांपासून पनवेलमध्ये नृत्यांचे धडे विद्यार्थ्यांना देत आहे. अल्पावधीतच या संस्थेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी प्रशिक्षित झाले असून या विद्यार्थ्यांनी कायम चमकदार कामगिरी केली आहे.  त्याचप्रमाणे या स्पर्धेतही सुवर्णयश संपादन करीत संस्थेच्या आणि पनवेलच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.