रायगडात महिलेने एस टी बसमध्ये दिला बाळाला जन्म : एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे बाळ बाळंतीण सुखरूप
सिटी बेल । रायगड । धम्मशील सावंत
एका महिलेने प्रवासादरम्यान चक्क बाळाला जन्म दिल्याची घटना विहुले कोंड येथे घडली आहे. बसचालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ बस साई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्याने तिच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. मात्र दिलेली मुदतीपूर्वी प्रसूती झाल्याने व बाळाचे वजन कमी भरल्याने या महिलेला पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. वैष्णवी विकास शिगवण वय 32 रा. श्रीवर्धन कोंड असे या महिलेचे नाव आहे. वैष्णवी या माणगाव येथे सोनोग्राफी करण्यासाठी आल्या होत्या, घरी जाण्यासाठी त्या माणगाव म्हसळा या एस टि बस मध्ये बसल्या. गाडी विहुल कोंड येथे आल्यावर सौ वैष्णवी या गाडीतच प्रसूत झाल्या. आणि त्यांना मुलगा झाला.
या बसचे चालक श्रीकृष्ण भावे यांनी त्वरित बस साई प्राथमिक आरोग्य केंद्रात नेली. डॉ संदीप भालके यांनी यावेळी महिला व बाळाची तपासणी केली, बाळाचे वजन कमी भरल्याने पुढील उपचारासाठी माणगाव येथे आणण्यात आले. सध्या बाळ व आई सुखरूप असल्याची माहिती मिळते.

Be First to Comment