Press "Enter" to skip to content

राज ठाकरेंचा आघाडी सरकारवर हल्लाबोल

वाझे हा मुख्यमंत्र्यांच्या खास माणुस : केंद्राने चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल : राज ठाकरे

सिटी बेल लाइव्ह । मुंबई ।

मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींचं टार्गेट दिलं होतं. राज्यात अनेक शहरं आहेत. त्यात अनेक पोलिस आयुक्त आहेत. त्यांना कितीचं टार्गेट देण्यात आलं ? असा सवाल करतानाच या प्रकरणाचा केंद्र सरकारने तपास करावा. केंद्राने याचा तपास केल्यास राज्यात फटाक्याची माळ लागेल, असा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुखांवरच आरोप केले होते. देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटींची वसुली करण्यास सांगितलं होतं, असं सिंग यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विट करून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरे यांनी या प्रकरणी अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट केला.

वाझेंना शिवसेनेत कुणी आणलं?

सचिन वाझे हा मुख्यमंत्र्यांचा अत्यंत जवळचा होता. वाझेंना शिवसेनेते प्रवेश करण्यासाठी कोण घेऊन गेलं होतं, हे अजूनही बाहेर आलेलं नाही. वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आग्रह धरला होता. फडणवीसांनीच हे सांगितलं आहे. याचा अर्थ एवढाच की वाझे हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे होते. उद्धव ठाकरे आणि अंबानी यांचे मधूर संबंध आहेत. उद्धव यांच्या शपथविधीला अंबानी कुटुंब सहपरिवार हजर होते. मग वाझे बॉम्बची गाडी कुणी सांगितल्याशिवाय अंबानीच्या घराखाली ठेवेल काय? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

त्याशिवाय वाझे बॉम्बची गाडी ठेवेल का?

यापूर्वी अतिरेकी बॉम्ब ठेवतात असं ऐकलं होतं. आता पोलीसच बॉम्ब ठेवत असल्याचं उघड झालं आहे. ही धक्कादायक बाब आहे. कुणाच्या तरी सांगण्यानुसार वाझे हे कृत्य करतील का? पोलिसांना कुणाच्या तरी सूचना असल्याशिवाय पोलीस हे धाडसच करणार नाही, असंही ते म्हणाले.

तर अनेकजण आत जातील

हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ते केवळ पोलीस दलातील वादाशी संबंधित नाही. तर बॉम्ब ठेवण्यापर्यंतचं हे प्रकरण आहे. त्यामुळे केंद्राने यात हस्तक्षेप करावा. केंद्राने याची चौकशी करावी. महाराष्ट्र सरकार या प्रकरणाची योग्य चौकशी होणार नाही. केंद्राने चौकशी चौकशी केली तर या प्रकरणात फटाक्याची माळ लागेल. अनेक अनाकलनीय चेहरे समोर येतील, असं सांगतानाच या प्रकरणात कोणकोण आत जातील याची कल्पनाही कोणाला करता येणार नाही. केंद्राने जर हस्तक्षेप केला नाही तर राज्य अराजकाकडे जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

परमबीर सिंगाना का हटवलं?

परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून का हटवलं, जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का नाही केलं ? त्यांची चौकशी का नाही केली गेली ? त्यांची बदली का केली गेली ? मुळात मुकेश अंबानींच्या घराच्या बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे ? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं ? ह्याची उत्तरं अजून का नाही मिळाली ?’ असेही ते म्हणाले.

राज्यात निष्पक्ष तपास होईल याची खात्री नाही

‘जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे. ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी. माझी माध्यमांना विनंती आहे की त्यांनी हा विषय गंभीर आहे ह्याची जाणीव ठेवून तो विषय भरकटू देऊ नये, आणि हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला ह्याच्या मागे लागावं,’ असा सल्लाही त्यांनी दिला.

चौकशी व्यवस्थित होऊ द्या

‘सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा हे राजकीय मुद्दे आहेत.ह्यात आत्ता नको पडूया. ह्याची चौकशी व्यवस्थित होऊद्या. कारण चौकशी व्यवस्थित झाली नाही तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील.पोलिसांना हे कृत्य करायला लावणारे कोण हे आधी कळू द्या,’ असेही त्यांनी सांगितले.

इतर आयुक्तांना किती मागितले?

‘गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला 100 कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे.’ जर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना 100 कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण कळला पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.