Press "Enter" to skip to content

हृदयविकार असलेल्या नागरिकांना उन्हाचा वाढता ताप !!

मधुमेह व उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवाहन

सिटी बेल लाइव्ह । आरोग्य प्रतिनिधी ।

मार्च महिन्यामध्ये चक्क मे महिन्याचा अनुभव येत असून तापमानवाढीनेही रेकॉर्ड ब्रेक केला आहे. घरातून बाहेर पडले रे पडले की शरीराला उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. अचानक वाढलेल्या तापमान नियंत्रणासाठी आपल्या शरीराला खूप बदल करावे लागतात. शरीर उन्हाळ्यासाठी अनुरूप बदल करत असताना अनेक आजारांना बळी पडण्याचा किंवा दुखणी डोके वर काढण्याचा संभव असतो.

उन्हाळ्यामध्ये शरीराला द्रव पदार्थांची गरज भासू लागते तसेच शरीराचे तापमान स्थिर राखण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी हृदयाला रक्‍ताचे अधिक वेगाने पंपिंग करावे लागते व या प्रक्रियेमध्ये बिघाड झालेले किंवा नाजूक हृदय असलेल्यांना तसेच उच्च रक्तदाब व मधुमेहाचा सामना करीत असलेल्या नागरिकांमध्ये उष्माघात, डिहायड्रेशन आणि हृदयविकार होण्याची शक्यता २० टक्क्यांनी वाढत असल्याची माहिती नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे हृदयशल्यविशारद डॉ संजय तारळेकर यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयशल्यविशारद डॉ संजय तारळेकर सांगतात, ” डिहायड्रेशन म्हणजेच शरीरामधील पाणी कमी होणे यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करीत असेलल्या धमन्या उत्तेजित होऊन हृदयविकार होण्यासाठी कारणीभूत आहे.

उन्हाळ्यामुळे शरीरातील द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइटस्ची अतिरिक्‍त हानी होत असल्याने भरपूर पाणी, नारळाचे पाणी, सुप्स आणि फळांचे रस पिऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राखणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात कॅफिनयुक्‍त पेये जास्त घेतल्यास किंवा मद्यपान केल्यास डिहायड्रेशनचा धोका असतो. त्यामुळे तुमचा हृदयविकार बळावण्याची, आणखी गुंतागुंती वाढण्याची शक्यताही निर्माण होते. शिवाय, अँजिओप्लास्टी होऊन स्टेंटस् बसवलेल्या किंवा हृदयात कृत्रिम झडपा बसवलेल्या रुग्णांनी तर अधिक काळजी घेतली पाहिजे. कारण, डिहायड्रेशनमुळे रक्‍त दाट होऊन स्टेंटस्मध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. “

उष्माघाताबरोबर शरीरामध्ये जलशुष्कता (डिहायड्रेशन)असल्यास मळमळ, उलट्या, डोकेदुखी आणि रक्तदाब कमी होणे आढळून येते. परिणामी ती व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते, तीव्र स्वरूपाचा उष्माघात असल्यास व्यक्ती गोंधळल्यासारखी होते, कधीकधी संतापते, मद्यपान केल्यासारखी स्थिति होते. नाडी जलद लागते,श्वसनाचा वेग वाढतो. रक्तदाब कमी झाल्याने हृदय अधिक वेगाने आकुंचन पावून शरीरास पुरेसा ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न करते. रक्तदाब कमी झाल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व त्यामुळे शरीरातील हृदयासोबतच इतर अवयवांचे कार्य थांबते आणि मृत्यू ओढवतो म्हणूनच उष्माघात झालेल्या व्यक्तीला तातडीने सावलीत नेणे गरजेचे आहे यासोबतच त्या व्यक्तीच्या खांद्यावर, कपाळावर आणि मांड्यावर पाणी ओतावे व त्यांना पाणी पिण्यास द्यावे व लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावे, अशी माहिती हृदयशल्यविशारद डॉ संजय तारळेकर यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.