Press "Enter" to skip to content

कोरोनाचा कहर : रायगडात रुग्णसंख्या 10 हजारी पार, राज्यात रायगड पाचव्या स्थानी

गल्ली पासून दिल्ली कोरोनाने हादरली : रायगडात 260 रुग्णांचा कोरोना ने घेतला बळी

संसर्ग थांबेना : चिंता मिटेना

सरकार-प्रशासन हतबल : लॉकडाऊन काळातही रुग्ण संख्या नियंत्रणाबाहेर

सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत )


संपूर्ण जगाची झोप उडविणाऱ्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्येने  साडे दहा लाखाचा टप्पा ओलांडला आहे.  रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बघता बघता या आजवरच्या एकूण रुग्णसंख्येने  दहा हजारी पार केली आहे. 

राज्यातील सर्वाधिक जास्त रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यात  रायगड पाचव्या स्थानावर आहे.  जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागाला कोरोनाचा  विळखा घट्ट बसत  आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढू लागली आहे. गल्ली पासून दिल्ली कोरोना या तीन शब्दांनी हादरून गेली आहे. रायगड जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्यविभागासह शासन, प्रशासन सारेच शर्तीचे प्रयत्न करीत आहेत, मात्र कोरोनाचा कहर काही केल्या थांबत नसल्याने सारेच हतबल झाले आहेत. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात देखील रुग्णसंख्या गुणाकार पद्धतीने वाढत असल्याने कोरोनाला रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.

अशातही दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  समाधानकारक  असून आजवर  एकूण 6 हजार 225  रुग्णांनी कोरोनाचे युद्ध जिंकले आहे.  

दिवसात 351 रुग्णांची वाढ

रायगड जिल्ह्यातील एका  दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत एकूण 351 ने वाढ झाली असून यामध्ये पनवेल मनपा-125, पनवेल (ग्रा)-58, उरण-29, खालापूर-45, कर्जत-9, पेण-32, अलिबाग-35,  श्रीवर्धन-2,  महाड-16 असा समावेश  आहे.  सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना बाधित नागरिकांची संख्या एकूण 3 हजार 478 झाली आहे. यामध्ये पनवेल मनपा-1394, पनवेल ग्रामीण-480, उरण-158, खालापूर-329, कर्जत-100, पेण-385, अलिबाग-333, मुरुड-56, माणगाव-37, तळा-2, रोहा-60, सुधागड-1, श्रीवर्धन-36, म्हसळा-48, महाड-51, पोलादपूर-8 या तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. 

260 नागरिक कोरोनाने दगावले

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी अनेकांचा बळी घेतला आहे. 

आतापर्यंत पनवेल मनपा-110, पनवेल ग्रामीण-31, उरण-17, खालापूर-16, कर्जत-12, पेण-13, अलिबाग-14, मुरुड-7, माणगाव-2, तळा-2, रोहा-5, सुधागाड-1, श्रीवर्धन-4, म्हसळा-7, महाड-15, पोलादपूर-4 असे एकूण 260 नागरिक मृत पावले आहेत.  एका दिवसात 4 व्यक्ती मृत झाल्या असून ( पनवेल (मनपा)-2, पनवेल (ग्रामीण)-1,  महाड-1) असा समावेश आहे. 

6 हजार 225 रुग्णांनी जिंकले कोरोना युद्ध

कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 6 हजार 225 इतकी असून यामध्ये  पनवेल मनपा-3 हजार 235, पनवेल ग्रामीण-1008, उरण-434, खालापूर-137, कर्जत-212, पेण-262, अलिबाग-226, मुरुड-33, माणगाव-164, तळा-18, रोहा-245, सुधागड-7, श्रीवर्धन-59, म्हसळा-56, महाड-89,  पोलादपूर-40 अशा नागरिकांचा समावेश आहे. 

दिवसभरात कोरोनाचे युद्ध जिंकून जिल्ह्यातील विविध तालुक्यातून  सुखरूप घरी परतलेल्या नागरिकांची संख्या 370 आहे. यामध्ये पनवेल मनपा-161, पनवेल ग्रामीण-61, उरण-44, कर्जत-26, पेण-31, अलिबाग-13,  माणगाव-18,  रोहा-10,  श्रीवर्धन-1, महाड-5 आदी नागरिकांचा समावेश आहे. 

आतापर्यंत जिल्ह्यातून 33  हजार 350 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 746 आहे. 

कोरोनाचे महाभयंकर  संकट

कोरोनाच्या वैश्विक महामारीने संपूर्ण जग कवेत घेतले आहे. कित्येक महिने देशाचे अर्थचक्र कोलमडले आहे. हातावर पोट असलेल्या मजुरापासून अगदी मोठमोठे उद्योगपती देखील कोरोनाच्या संकटात भरडून निघालेत. अनेक उद्योग, कारखान्यातील कामगार कपातीने अनेकजण बेरोजगारीच्या खाईत लोटले गेले असून अनेकांच्या चुली विझल्याने उपसमारीसारख्या संकटाचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोरोनाचे महाभयावह संकट कधी जाणार, कधी सर्व काही पूर्ववत होणार? सुखाची झोप कधी लागणार?मोकळा श्वास कधी घेणार या चिंतेत रायगडकर दिवसामागून दिवस ढकलत आहेत. 

संसर्ग रोखण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्र घोषित

रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून कोरोना रुग्ण आढळून आलेली क्षेत्र जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशाने कोरोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले जातात. या क्षेत्रातील नागरिकांना बाहेर जाण्यास व येण्यास बंदी घातली जाते. या क्षेत्रात गावे, सोसायटी, व मानवी लोकवस्ती असलेल्या भागाचा समावेश असतो. 

उसनवारी देणारे झाले घेणारे

कोरोनाने संपूर्ण  जग बदलवून टाकले आहे. सारेच जण आर्थिक विवंचनेत आहेत. अनेकांचे  खळखळणारे खिसे आता शांत आहेत. परिस्तिती इतकी बिकट झाली आहे की  एकेकाळी रुबाबात राहून उसनवारी देणाऱ्यावर आता उसनवारी घेण्याची वेळ आली आहे. मात्र  आभाळ सगळीकडेच फाटलं आहे ठिगळ कुठं लावायचं हा प्रश्न साऱ्यांसमोर आहे. आता दिवस कसे काढायचे व पुढचे दिवस कसे असतील हीच चिंता सर्वसामान्य माणसाला सतावत आहे. 

विलगीकरणं कक्षातील बलात्काराने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पनवेलमधील कोन नजीक इंडिया बुल येथील विलगीकरण कक्षात एका 40 वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे विलगिकरण कक्षात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. तर महिलांनी उपचारासाठी कसे जायचे? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

लॉकडाऊन शिथिल, जनतेला दिलासा

बाजारात खरेदीसाठी आलेले नागरिक

रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार, आमदार यांच्या बैठकीत निर्णय होऊन दहा दिवसाचा लॉक डाऊन जिल्ह्यात घोषित करण्यात आला. तीन ते चार महिन्यांपासून कोरोना व लॉक डाऊन ने हैराण झालेल्या रायगडवासीय जनतेसह लहान मोठे व्यापारी अक्षरश: त्रासले होते. लॉक डाऊनने हातावर पोट असलेले श्रमिक , कामगार, मजूर, व्यवझाईक देखील रडकुंडीला आले.  रोजगार संपुष्टात आल्याने उपासमारीच्या खाईत अनेक जण लोटले गेले. अशात लॉकडाऊन रद्द करण्याचा रेटा जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर होत होता. अखेर जिल्हा प्रशासनाने सुवर्णमध्य काढत शनिवारी जिल्हाधिकारी यांनी सकाळी 06 ते 10 पर्यंत लॉकडाऊन शिथिल केले. या निर्णयाचे जिल्हयात जोरदार स्वागत करण्यात आले. 

गटारी जोरात

गटारीसाठी चिकन मटण च्या दुकानासमोर ग्राहकांची रांग

रायगड जिल्हयात कोरोनाने चांगलीच दहशत माजवली आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडताना स्वतःची पुरेपूर काळजी घेताना दिसत आहे. अशातच लॉक डाऊन मूळे गटारीचे बेत कोलमडणार अशा चिंतेत असलेले रायगडकर लॉक डाऊन मोक्यात शिथिल झाल्याने खुश झाले. आषाढ महिन्याच्या शेवटचा दिवस दीप अमावस्या ने अर्थातच गटारीच्या सणाने संपून मग श्रावण महिन्याचे उपवास सुरू होतात. गटारी दिवशी  वेगवेगळे मांसाहारी पदार्थ व मद्याचे प्याले रिचवत अनेकजण बेभान होऊन जातात. यावर्षी देखील अनेकांनी घरच्या घरी गटारी जोरदार साजरी केल्याचे दिसून आले. 

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

दरम्यान रायगड जिल्हा प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी कर्तव्ये जबाबदारीने निर्णय व पुरेपूर खबरदारी घेत असून रायगडवासीय जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सर्व नियम, अटी व शर्थीचे पालन करावे, कामाशिवाय घराबाहेर पडू नये, गर्दी टाळा, सतर्क राहावे, काळजी करू नये, काळजी घ्यावी, असे आवाहन निधी चौधरी जिल्हाधिकारी रायगड यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.