Press "Enter" to skip to content

खोपटे येथे अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।

श्री परमपूज्य सद्गुरू गोपाळकाका महाराज ट्रस्ट -खोपटे बांधपाडा उरण यांच्या वतीने श्रीमत परमहंस जीवन्मुक्त स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीमत परमहंस जीवन्मुक्त स्वामी महाराज गोपाळकाका नगरी खोपटे, काकांचा पाडा, तालुका उरण, जिल्हा -रायगड येथे माघ शुद्ध षष्टी गुरवार दि 18/2/2021 ते माघ शुद्ध द्वादशी बुधवार दि 24/2/2021 या दरम्यान अखंड हरीनाम सप्ताह, गुरुदशमी सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मास्क व सॅनिटायझरचा वापर करून, सोशल व फिजिकल डिस्टन्स पाळून मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा करण्यात आला. दि 24/2/2021 रोजी या सप्ताहाची सांगता करण्यात आली.

उरण मधील प्रसिद्ध संत जीवन्मुक्त स्वामी यांचे शिष्य तथा खोपटे गावातील सुपुत्र संत गोपाळकाका यांनी जीवन्मुक्त स्वामींकडून अनुग्रह घेतला होता. त्यांचे शिष्यत्व पत्कारले होते. तो अनुग्रहाचा दिवस त्यांचे शिष्य गुरुदशमी सोहळा म्हणून साजरे करतात. संत गोपाळकाका यांची समाधी खोपटे गावातच आहे. संत गोपाळकाका यांना मानणारा खूप मोठा शिष्यवर्ग उरण तालुक्यात असून संत गोपाळकाका यांचे शिष्य मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, रायगड जिल्ह्यात आदी विविध विभागात मोठ्या प्रमाणात आहेत.त्यांचे शिष्य गुरुदशमी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरे करतात.

गुरुदशमी निमित्त अनेक ठिकाणी अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उरण तालुक्यातील खोपटे गावात अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सण 2020 साली संत गोपाळकाका यांची शताब्दी वर्ष साजरी करण्यात आली होती. यावर्षी यंदाचे हे 101 वे वर्ष आहे.

आजच्या विज्ञान युगाच्या जोरावर भरारी मारणाऱ्या मानवाला हा भवसागर तरुण जाण्यासाठी तसेच अलभ्य नरदेहाचे उद्धार होण्यासाठी मनुष्याला अध्यात्माची जोड हवी आहे.व मनशांतीसाठी शुद्ध ज्ञानाची गरज आहे. अंतःकरण शुद्ध करण्याचा अध्यात्म हाच एकमेव मार्ग आहे. समाज सुधारण्यासाठी समाज प्रबोधन करणे, धर्माचे पालन करणे हे एकमेव उद्दीष्ट असून ते साध्य करण्यासाठी हरिनामाची प्रेरणा देणे हाच खरा सन्मार्ग आहे. या हरीनाम यज्ञाद्वारे समाज व्यसन मुक्त करणे सद्गुरू गोपाळकाका यांचे स्वप्न, उद्देश तथा उपदेश असून समाज सुसंस्कारक्षम करणे तसेच सदाचारी जीवनाची प्रेरणा देणे हाच अध्यात्मिक ज्ञानाचा खरा सुमार्ग आहे. याचे भान ठेवून येणारी पिढी संस्कारक्षम बनविण्यासाठी, समाजाला निर्व्यसनी, सदाचारी बनविण्यासाठी संत शिरोमणी गोपाळकाकांच्या खोपटे नगरीत अखंड हरीनाम यज्ञाचा, ज्ञानेश्वरी वाचन, कीर्तन, प्रवचन, भजन, हरिपाठ असे दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन सप्ताहा दरम्यान सोशल व फिजिकल डिस्टन्स पाळून आयोजित करण्यात आले होते असे संत गोपाळकाका यांचे नातू हरिभक्त परायण घनश्याम ठाकूर महाराज यांनी सांगितले.

श्री परमपूज्य सद्गुरू गोपाळकाका महाराज ट्रस्ट -खोपटे बांधपाडा उरण यांच्या वतीने दरवर्षी खोपटे येथे हरीनाम सप्ताह साजरा होतो. विशेष म्हणजे विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्ती स्वतःहून या सप्ताहास अन्नदान, वस्तू, सेवारूपी दान करतात. ग्रामस्थ मंडळ खोपटे, ग्रामस्थ मंडळ बांधपाडा, ग्रुप ग्रामपंचायत खोपटे बांधपाडा,श्री ज्ञानेश्वरी सेवा मंडळ (पनवेल -उरण विभाग ), संत शिरोमणी गोपाळकाका सेवाधारी मंडळ खोपटे परिसर, खोपटे सातपाड्यातील क्रिकेट क्लब यांच्या सहकार्याने या वर्षीचा हरीनाम सप्ताह, गुरुदशमी सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सोशल व फिजिकल डिस्टन्स पाळून मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.