Press "Enter" to skip to content

कोकणाची लाईफलाईन होतेय पोलादपूर शहरामध्ये अंडरपास !

राजकीय पक्ष आताही दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मश्गुल !

सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर ।

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याच्या प्रारंभी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळयालगत चौपदरीकरणादरम्यान कोकणाची लाईफलाईन असलेला राष्ट्रीय महामार्ग अंडरपास होत असताना शहराच्या भविष्याचे संकेत देत आहे.मात्र, मागील वेळी नगरपंचायत पोलादपूरच्या 2016 च्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचे डोहाळे लागलेले राजकीय पक्ष आताही दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मश्गुल झालेले दिसून येत आहेत.

कोकणातील पत्रकार संघटनांनी सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विविध प्रकारच्या आंदोलनानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मान्यता मिळाली. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जनसुनावणी टाळली गेल्याने स्थानिक जनता या चौपदरीकरणाबाबत अंधारात राहणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले. भूसंपादनास विरोध न झाल्यास पाचपटीने मोबदला देण्याची भूमिका केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी जाहिर केली. यानंतर या पत्रकार संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेने चौपदरीकरणासाठी ज्यांच्या जमिनी, घरे अथवा शेतीचे भूसंपादन होऊन राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण होतेय, त्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याला विषयांतर मानले.

यामुळे या आंदोलनांसाठी आग्रही असलेल्या कोकणातील पत्रकारांना एकत्र करणाऱ्या पत्रकाराने पोलादपूर तालुक्यापुरता स्थानिक बाधितांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी संघटना तयार करून प्रयत्न केला. मात्र, यानंतर सदर पत्रकाराला एकाकी पाडण्यासाठी नेतृत्व करणाऱ्या संघटनेने खोगीरभरती करून पोलादपूर तालुक्यातील बाधितांच्या संघटनेतील झारीतील शुक्राचार्यांना साथ देण्याचा सपाटा लावला.

याचदरम्यान, एकिकडे भूसंपादनाचा मोबदला वाटपाची प्रक्रिया तर दुसरीकडे पोलादपूर नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. परिणामी, या दोन्ही प्रक्रियांदरम्यान बाधितांनी मोबदला मिळविण्याकडे लक्ष दिले तर राजकीय पक्षांनी चौपदरीकरणाच्या भवितव्यातील परिणामांपेक्षा बाधितांवर प्रभाव निर्माण करण्यासाठी राजकीय भवितव्याला प्राधान्य दिले. यानंतर चौपदरीकरण कसे होणार, शहरातील चौपदरीकरणाला आवश्यक 60 मीटर भूसंपादन कसे होणार, चौपदरीकरणानंतर पोलादपूरची ओळख असलेले पोलादपूर एसटी बसस्थानक आणि छ.शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या दोन्हींबाबत विवादाची परिस्थिती दिसून आली.

यावेळी चौपदरीकरणादरम्यान, पोलादपूर एसटी बसस्थानकाची जमीन खासगी मालकीचे असल्याने तेथे भूसंपादन करण्यास आक्षेप घेऊन तसा निर्णय घेण्यात सदरच्या जमीनमालकांचा नातू यशस्वी झाला. त्यामुळे मोबदला प्रक्रियेमध्ये त्यांचा अथवा एस.टी. महामंडळाचा समावेश टळून एस.टी.स्थानकाने अद्याप ओळख टिकवून ठेवली तर छ.शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळयाबाबतही एका संघटनेची सक्रीयता दिसून येऊ लागली आहे. मात्र, या दोन्ही महत्वाच्या ओळखींखेरिज, अनेक व्यक्तींना त्यांच्या दुकाने अथवा व्यवसायांची ओळख टिकविण्याची मानसिकता दिसून आल्याने चौपदरीकरणाला आवश्यक 60 मीटर भूसंपादनाऐवजी 45 मीटर भूसंपादनाची मानसिकता वाढीस लागली आणि यामुळे पोलादपूर शहरातील भूसंपादनास विरोध न झाल्यास पाच पटीने मोबदला मिळण्याची शक्यता दुरावली.

यासोबतच, संपादित 45 मीटर जमिनीचा योग्य विनियोग करून पोलादपूर शहरासाठी चौपदरीकरणाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागावर आल्याने पोलादपूर शहरातील कोकणाची लाईफलाईन चक्क बॉक्स कटींग करून अंडरपास पध्दतीने दृष्टीआड होण्याची परिस्थिती निर्माण झाली. पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ देवस्थानापासून शून्य खोली सुरू होऊन काटेतळी-सडवली फाटयादरम्यान राष्ट्रीय महामार्ग अंडरपास म्हणजे भूमिगत होतानाचे दृश्य म्हणजे ज्यांनी 60 मीटर भूसंपादनास विरोध दर्शविला त्यांच्या उर्वरित जागेमधून हा राष्ट्रीय महामार्ग दृष्टीसही पडणार नाही इतक्या खोल असणार आहे. सद्यस्थितीत पोलादपूर शहरातील छ.शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती अश्वारूढ पुतळयाजवळ अंडरपास रस्त्याचे भूमिगत झालेले स्वरूप दिसून येईल, असा रस्ता खोदून तयार केला बॉक्स दृष्टीपथात येण्याइतपत बांधकाम दिसून येत आहे.

पोलादपूर एस.टी.बसस्थानकामध्ये बस येण्यासाठी सर्व्हीस रोडची ज्या गरज आहे. त्याच सर्व्हीस रोडवरून स्थानकाबाहेर आल्यानंतर गाडयांना महाबळेश्वरकडे, गोव्याकडे अथवा मुंबईकडे जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ होताना छ.शिवाजी महाराजांचा पुतळा परिसरात कशारितीने रस्ता तयार होणार याबाबत उत्सुकता असली तरी अंडरपास झालेल्या लाईफलाईनमुळे पोलादपूर शहराच्या भवितव्याबाबत कोणीही गांभिर्याने विचार करताना दिसून येत नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी पोलादपूर नगरपंचायतीने शहररचना आराखडयाबाबत सुचना व हरकती देण्यासंदर्भात नोटीस प्रसिध्द केली आहे. पोलादपूर शहराचा चेहरा भूसंपादन आणि चौपदरीकरणानंतर कसा असावा, याबाबत नगरपंचायतीचे कोणतेही मत अथवा हस्तक्षेपाचे स्वरूप राष्ट्रीय महामार्गाच्या दूतर्फा असलेल्या पोलादपूर शहराचे भविष्यातील नगरनियोजन करताना दिसून येत नसल्याबद्दल दुसरी पंचवार्षिक निवडणूक लढवू पाहणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाला आश्चर्य वाटलेले दिसून येत नाही. पोलादपूर शहरवासियांनाही शहराच्या बदलत्या स्वरूपामुळे शहराच्या विकासाला सरळछेद बसणार असल्याचा खेद दिसून येत नाही. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत निवडणुक प्रक्रिया सुरू होऊनही अद्याप निर्णायक स्थितीत आली नसल्याने पोलादपूरकरांनी मिळालेल्या अवधीमध्ये राजकीय पक्षांप्रमाणे निवडणुक प्रक्रियेमध्ये मश्गुल राहिल्यास पोलादपूर शहराचे भवितव्यदेखील अंडरपासप्रमाणे अंधारात जाण्याची परिस्थिती दिसून येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.