100 हून जास्त खेळाडू राज्य सरकारला परत करणार ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’
वर्षभरापूर्वी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राज्य सरकारने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान केले. यावेळी त्यांना शासकीय नोकरी मध्ये सामावून घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. परंतु ते पूर्ण न झाल्याने राज्यातील जवळपास 100 हून अधिक खेळाडूंनी हे पुरस्कार परत करण्याचे जाहीर केले आहे.खेळासाठी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे पणाला लावून हे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचा नावलौकिक करत असतात. यासाठी शासन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानितही करते, परंतु या खेळाडूंना नंतर नोकरीसाठी वणवण भटकण्याची वेळ येते.
गतवर्षी क्रीडा पुरस्कार विजेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते अद्यापही पूर्ण झालेले नसल्याने या सर्व राज्यभरातील पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत आवाज उठवला आहे. या खेळाडूंनी आपापल्या जिल्ह्यातील क्रीडा कार्यालयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. यानुसार 19 फेब्रुवारीपर्यंत राज्य शासनाने त्यांच्याबाबत काही निर्णय घेतला नाही, तर 24 फेब्रुवारीला हे सर्व खेळाडू आपले पुरस्कार परत करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Be First to Comment