Press "Enter" to skip to content

अपुर्व उत्साह, जल्लोषात रोटरी क्लब ऑफ उलवे मॅरेथॉन 2021 संपन्न

उलवे मॅरेथॉन मध्ये पुढील वर्षी 52 हजार स्पर्धक धावतील : डॉक्टर गिरीश गुणे यांचा विश्वास

सिटी बेल लाइव्ह । उलवे ।

रोटरी क्लब ऑफ उलवे नोड आणि अन्य सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मॅरेथॉनचे यंदाचे तिसरे वर्ष होते. श्री साई देवस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष तथा रोटेरियन रवीशेठ पाटील यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये 351 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

कोरोना विषाणूच्या सावटामुळे यंदाचे वर्षी मॅरेथॉनचे नँनो स्वरूप पाहायला मिळाले. भव्य दिव्य मॅरेथॉन आयोजित करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ उलवे यांनी यंदाच्या वर्षी मुद्दामच सोशल डिस्टन्स राखण्याच्या उद्देशाने छोट्या स्वरूपात मॅरेथॉनचे आयोजन केले होते. डॉक्टर गिरीश गुणे यांनी झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात केली.

आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर गिरीश गुणे म्हणाले की सलग तिसऱ्या वर्षी आयोजकांनी मला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केल्या बद्दल त्यांचे धन्यवाद. पहिल्या वर्षी एक धाव पाणी बचतीची अशी थीम घेऊन मॅरॅथॉन आयोजित करण्यात आली होती. तर दुसर्‍या वर्षी एक धाव रस्ता सुरक्षेसाठी अशी थीम घेऊन जवळपास 35 हजार स्पर्धक या स्पर्धेमध्ये मध्ये सहभागी झाले होते. रवीशेठ पाटील यांच्या 51 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 351 स्पर्धक यावर्षी धावत आहेत. आयोजकांनी त्यांच्या क्षमतेच्या अवघ्या एक टक्का स्पर्धक यावर्षी बोलावले याचे कारण कोरोनाविषाणू चे संकट अद्यापही संपलेले नाही. कोरोनाविषाणू च्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी घेतलेल्या निर्णयाचे मी मनःपूर्वक स्वागत करतो व आयोजकांचे अभिनंदन करतो. पुढच्या वर्षी रवीशेठ पाटील यांचा बावन्नावा वाढदिवस आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये 52 हजार स्पर्धक सहभागी होतील.

पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र पाटील यांनी देखील आपल्या मनोगतातून रवीशेठ पाटील व तमाम आयोजक सदस्यांचे कौतुक केले. मॅरेथॉन आयोजनामध्ये उलवे सेनेच्या कार्यकर्त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता. यंदाच्या वर्षी एक धाव पर्यावरण संवर्धनासाठी अशी थीम घेण्यात आली होती. री युज अंँड रिसायकल असे संदेश जागोजागी देण्यात येत होते. मॅरेथॉन पूर्वी झुंबा स्पेशलिस्ट अनिता रॉय आणि अखिल यांच्या बिट्स वर उलवेकर अक्षरशहा थिरकले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणारे सिनेकलाकार बशीर अली यांना देखील झुंबा च्या बीटवर थिरकरण्याचा मोह आवरला नाही.

कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक रवीशेठ पाटील यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खरे तर कुठलाच गर्दी जमा होणारा कार्यक्रम घेऊ नये असे मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले होते. परंतु उलवे मॅरेथॉन उलवेकरांची ओळख बनलेली असून किमान आपल्यापुरती तरी मॅरेथॉन आयोजित करावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये याकरता आखून दिलेले सारे निर्बंध पाळत यंदाची स्पर्धा पार पडल्याबद्दल मी आयोजक सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच मॅरेथॉन आयोजनाबाबत समजल्यानंतर उरण, खालापूर, नवी मुंबई येथील विविध भागांतून स्पर्धक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो.

कार्यक्रमाला डॉक्टर गिरीश गुणे, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र पाटील, न्हावे सरपंच जितेंद्र म्हात्रे, डॉक्टर नितीन परमार, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक बाळाराम पाटील, मो का मढवी गुरुजी, माजी जि प सदस्य पार्वती ताई पाटील, पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, रोटरी क्लब ऑफ उलवे नोड चे अध्यक्ष शिरीष कडू सिनेकलावंत बशीर अली आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या आयोजनामध्ये शिरिष कडू, सचिन मोरे, रोशनी डिमेलो, अजय दापोलकर, शेखर काशीद,निलेश ठाकूर ,मनीषा सोनार , जयंत म्हात्रे यांनी अथक परिश्रम घेतले. वयाच्या 64 व्या वर्षी देखील मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे एस डी सावंत यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.

स्पर्धेचा निकाल

मुले
प्रथम क्रमांक प्रशांत मिश्रा
द्वितीय क्रमांक करण शर्मा
तृतीय क्रमांक कमल कुमार

मुली
प्रथम क्रमांक ऋतुजा सकपाळ
द्वितीय क्रमांक अमृता पाटील
तृतीय क्रमांक सोनी जयस्वाल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.