Press "Enter" to skip to content

वैश्विक संकटातील गरजवंताच्या ‘मदती’चा गौरव

रामदास शेवाळे यांच्या सामाजिक कार्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक


सकाळ वृत्त समूहाकडून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत शिवसेना पनवेल महानगरप्रमुखांचा सन्मान

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।

शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी कोरोना संकटात गोरगरिबांना जीवनावश्यक मदत केली. अनेक कुटुंबांना आधाराचा हात दिला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचा सकाळ वृत्त समूहा’ने शनिवारी समारंभपूर्वक गौरव केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवाळे यांच्या कार्याचे कौतुक केले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा मुंबई येथे संपन्न झाला.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी टाळेबंदी घेण्यात आली. यामुळे अनेकांच्या घरात आर्थिक महामंदी शिरली होती . त्यामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली . याचा सर्वाधिक फटका शारीरिक दृष्ट्या विकलांगतत्व आणि वैधव्य आलेल्यांना बसला. एकीकडे नियतीने हिरावून नेले
दुसरीकडे कोरोना आणि तिसरीकडे आर्थिक विवंचना या पेचा मध्ये विकलांग आणि विधवा महिला सापडल्या होत्या. अशा कळंबोलीतील निराधारांना शिवसेनेचे महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी जीवनावश्यक मदत केली .

कळंबोली वसाहत येथे विकलांग आणि विधवा महिला आहेत. त्यांच्यावर अगोदरच नियतीने घाला घातलेला आहे. त्यातही उभारी घेऊन काही बांधव आणि भगिनी लहान लहान व्यवसाय करून किंवा काही ठिकाणी छोटीसी का होईना नोकरी करून  आपला उदरनिर्वाह करीत होते. परंतु दुर्दैवाने कोरोनाचे मोठे संकट ओढावले. त्यामध्ये  विकलांग बांधव आणि विधवा भगिनींवर मोठे संकट कोसळले . ते व त्यांची मुलं बाळ आणि कुटुंबातील सदस्यांवर  उपासमारीची वेळ आली . कळंबोलीतील अशा निराधारांना रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तांदूळ, गव्हाचे पीठ, कांदे, बटाटे या शिवाय इतर जीवनावश्यक वस्तू वाटपाचा संकल्प करण्यात आला. आणि लागलीच संकल्पाची पूर्तता सुद्धा केली. 

रामदास शेवाळे यांनी आठ टन जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या. त्यांचे किट बनवण्यात आले. विधवा आणि विकलांगांची माहिती  संकलित करण्यात आली . अतिशय हलाखीची परिस्थिती असणाऱ्यांना सुद्धा या वस्तू देण्यात आल्या.  सामाजिक अंतर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला.

कळंबोलीत आशिया खंडातील सर्वात मोठे स्टील मार्केट आहे. याठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोखंड येते आणि जाते. मालाची लोडिंग अनलोडिंग येथे केली जाते. प्लेट, सळई त्याचबरोबर इतर प्रकारच्या लोखंडांचा व्यापार या मार्केटमध्ये होतो. याठिकाणी मोठ्या संख्येने माथाडी कामगार काम करतात. त्यामध्ये परप्रांतीय मजुरांचा समावेश आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू झाला . त्यामुळे कळंबोली स्टील मार्केट बंद होते. क्रेनच्या सहाय्याने लोडिंग अनलोडींगला परवानगी द्यावी जेणेकरून, माथाडी कामगारांच्या हाताला काम मिळेल. तसेच लोखंडाची संबंधित असलेले उद्योगधंदे ही सुरू राहतील. या पार्श्वभूमीवर अटी आणि शर्तीच्या तत्वावर कळंबोली स्टील  मार्केटमध्ये परवानगी द्यावी अशी मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी केली होती.

त्यानुसार  काही अटी व नियम तसेच सोशल डिस्टन्स राखण्याच्या तत्वावर मुभा देण्यात आली . त्यानंतर काही  प्रमाणात कामांना सुरुवात झाली . दरम्यान लॉकडाऊन मध्ये हाताला काम नसल्याने अनेक माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यापैकी काहींना रामदास शेवाळे प्रतिष्ठान च्या माध्यमातून तांदूळ, गव्हाचे पीठ, बटाटे ,कांदा त्याचबरोबर इतर जीवनाश्यक वस्तू देण्यात आल्या. रामदास शेवाळे, प्रतिष्ठानचे सल्लागार अॅड श्रीनिवास क्षिरसागर , राजू दाव यांच्यासह स्टील व्यापारी राजू भाई दवे , परवीन गोयल , मुकादम सुभाष ढवळे, बालाजी खोडेवाल  यांनी मार्केट मध्ये जाऊन माथाडी कामगारांना खऱ्या अर्थाने मदतीचा हात दिला. कोरोना रुग्ण आढळल्यास संबंधित इमारतीवर सोसायट्यांना सील करण्यात येत असे. रहिवाशांना बाहेर जाण्यास मनाई केली जात होती. त्याचबरोबर बाहेरील व्यक्तींना या ठिकाणी येण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागले. अशा सोसायट्यांमध्ये सुद्धा रामदास शेवाळे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना काही प्रमाणात दिलासा दिला.

त्याच काळात रमजानचा पवित्र महिना सुरु होता. गोरगरीब मुस्लिम बांधवांना सुद्धा अन्नधान्य देऊन परधर्म सहिष्णुता एकात्मतेचा संदेश शेवाळे यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून दिला. हे करीत असताना गरीब कोरोना रुग्णांना मोफत औषध उपचार व्हावेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. या ठिकाणी पाठपुरावा करून संबंधितांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय अनेकांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून दिला. त्यांना आवश्यक असलेले औषध मिळवून दिले. शासकीय पातळीवर सुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यांवर पत्रव्यवहार करून या ठिकाणी सुविधा मिळाव्यात यासाठी महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी खऱ्या अर्थाने काम केले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना धीर आणि दिलासा त्यांनी दिला.

राज्य सरकारकडे या भागात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या अनुषंगाने पाठपुरावा केला. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनल वरील रुग्णालयात कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळावेत याकरिता वरिष्ठ पातळीवर साकडे घातले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाविषाणू चे संक्रमण होऊ नये या अनुषंगाने महापालिका प्रशासनाला वेळोवेळी सूचना करणारे पत्र त्यांनी दिले. त्याची काही प्रमाणात अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली. कोविड योद्ध्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ त्यांनी दिले. त्यांच्या समस्या आणि प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कोरोना काळात खऱ्या अर्थाने गरीब गरजूंना मदत करण्याचे दैवी काम रामदास शेवाळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले. त्या माध्यमातून अनेकांना दिलासा मिळाला. त्यांच्या या कार्याचा सकाळ वृत्त समूहा’ने शनिवारी गौरव केला. मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेवाळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सकाळ वृत्त समूहाचे प्रतापराव पवार, सकाळचे मुख्य संपादक राहुल गडपाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना महानगरप्रमुखांच्या पाठीवर मुख्यमंत्र्यांची थाप शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी कोरोना काळात सर्वसामान्य व गोरगरिबांना खऱ्या अर्थाने मदतीचा हात दिला. त्यांना जीवनावश्यक मदत करून वैश्विक संकटात एक प्रकारे आधार दिला. शेवाळे यांच्या कार्याची सकाळ वृत्त समूहा'ने दखल घेतली. आणि त्यांना शनिवारी सन्मानित करण्यात आले. आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल सारख्या ठिकाणी कोरोना काळात स्वतःला झोकून देत सामाजिक बांधिलकी जपल्याचे ऐकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बेहद खुश झाले. त्यांनी रामदास शेवाळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.