Press "Enter" to skip to content

प्रांताधिकाऱ्यांचे व तहसीलदारांचे चौकशीचे आदेश

कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात माती उत्खनन

दोनशे ब्रासची रॉयल्टी भरून हजारो ब्रास मातीचे उत्खनन : माती उत्खननात झाडांचीही कत्तल

नागोठण्यातील पूर रेषेतील जागेत भरावासाठी या मातीचा वापर : सीआर झेड कायद्याचेही उल्लंघन ?

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

नागोठण्याजवळील कोंडगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या एका आदिवासी वाडीच्या हद्दीतील गट क्रमांक २४१ मधील क्षेत्रात मातीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. महसूल खात्याच्या रोहा तहसील कार्यालयात केवळ २०० ब्रास मातीची रॉयल्टी भरून त्याच्या आड हजारो ब्रास मातीचे उत्खनन संबधितांकडून होत आहे. यातच धक्कादायक प्रकार म्हणजे खोदकाम केलेली ही माती नागोठण्यातील लेकव्ह्यू हॉटेल जवळील पूर रेषेतील एका भव्य जागेत भरावासाठी वापरण्यात येत आहे. तसेच या जागेपासून अगदी जवळच अंबा नदीचे पात्र असल्याने सीआर झेड कायद्याचेही उल्लंघन होण्याची दाट शक्यता असल्याने रोहाचे प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने व तहसीलदार कविता जाधव यांनी सदर प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील या गट क्रमांक २४१ मध्ये सुरु असलेले माती उत्खनन हे आदिवासी खातेदारांच्या जागेत गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरु आहे. माती उत्खनन करण्यासाठी या ठिकाणी दोन मोठ मोठ्या पोकलेन आणण्यात आल्या आहेत. माती उत्खननकरीत असलेली जागा ही जंगलात असल्याने माती उत्खननात झाडांचीही मोठ्या प्रमाणात कत्तल सुरु आहे. त्यामुळे केवळ २०० ब्रास मातीची रॉयल्टी भरली म्हणजे काहीही करण्याचा अधिकार संबधितांनी मिळविला काय ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. २०० ब्रास मातीची रॉयल्टी भरून हजारो ब्रास माती उत्खनन होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महत्वाचे म्हणजे आदिवासींच्या जागेतील मातीचा वापर केवळ सार्वजनिक कामासाठी करण्याचे संकेत असतांनाच खासगी जागेत मोठ्या प्रमाणात भराव करण्यासाठी या मातीचा वापर होत असल्याने महसूल खात्याचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष न गेल्याने सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कोंडगाव येथे उत्खनन केलेल्या मातीचा वापर करून नागोठण्यातील ज्या जागेत हा भराव करण्यात येत आहे ती जागा अंबा नदीच्या पात्रालगतच आहे. तसेच याठिकाणी भराव होत आहे म्हणजे येथे एखादा मोठा गृहनिर्माण प्रकल्प होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय महत्वाचे म्हणजे हे क्षेत्र अंबा नदी किनाऱ्या लगतच असल्याने किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) कायद्याचे उल्लंघन होण्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान याप्रकरणी रोहाचे प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने यांच्याशी संपर्क साधला असता याप्रकरणी आपण खातेनिहाय चौकशी करणार असून संबधित जागेची पाहणी करून त्या जागेचा वापर कशासाठी होणार आहे, पूर रेषा व सीआझेडचे उल्लघन येथे होत आहे का ? याचीही सखोल चौकशी करणार असल्याचे माने यांनी सांगितले. तर रोहाच्या तहसीलदार कविता जाधव यांनी सांगितले की, या भरावाची पाहणी करण्यास नागोठणे तलाठी व मंडळ अधिकारी यांना त्वरित पाठवून संबधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.