Press "Enter" to skip to content

सिटी बेल लाइव्ह प्रजासत्ताक दिन विशेष

दहशतवाद्यांमध्ये राहुन केला त्यांचा खात्मा : मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित शहीद मेजर मोहीत शर्मा यांची शहारा आणणारी कहाणी

सिटी बेल लाइव्ह । विशेष प्रतिनिधी ।  

देशाप्रती प्रेम असणं आणि या प्रेमापोटी देशसेवेत स्वत:ला झोकून देणं, प्राण पणाला लावणं या सर्व गोष्टी बोलण्यास जितक्या सोप्या आहेत तितक्याच मुळात त्या आपली परीक्षा पाहणाऱ्याही आहेत. देशासाठी प्राण त्यागण्याची वृत्ती उराशी बाळगण्यासाठी धाडस आणि कमालीची एकनिष्ठता हवीच. अशीच वृत्ती उराशी बाळगून एका व्यक्तीनं देशसेवेचा ध्यास घेतला होता. देशाप्रती कमालीचं प्रेम असणाऱ्या या व्यक्तीनं या जगाचा निरोप घेतला असला तरीही त्यांच्या योगदानाविषयी वाचताना उर अभिमानानं भरुन येतो आणि कंठ या समर्पणानं दाटून येतो. नकळतच डोळ्यातून आसवंही घरंगळतात.

ही व्यक्ती म्हणजेच शहीद मेजर मोहित शर्मा भारताच्या संरक्षणार्थ तत्पर असणाऱ्या सैन्यदलाच्या सेवेत असताना मेजर शर्मा यांनी अशी काही कामगिरी केली जी येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी जणू देशप्रेमाचा एक आदर्श पायंडा प्रस्थापित करुन गेली.

त्यांच्या याच कामगिरीला सलाम करण्यासाठी म्हणून आता एक चित्रपटही साकारण्यात येणार आहे. 2022 मध्ये स्वातंत्र्य दिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. शिव अरुर आणि राहुल सिंह यांच्या India’s Most Fearless 2: More Military Stories Of Unimaginable Courage And Sacrifice या पुस्तकातील पहिल्याच प्रकरणावर चित्रपटाचं कथानक आधारलेलं असेल असं सांगण्यात येत आहे. अप्लॉज एंटरटेन्मेंट आणि दृश्यम फिल्म्स अंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.


मेजर मोहित शर्मा हे पॅरा स्पेशल फोर्सच्या तुकडीत सेवेत होते. त्यांनी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांमध्ये राहून त्यांना असा विश्वास दिला होता, की आपणही या दहशतवादी संघटनेचा भाग असून आपल्यालाही भारतीय सैन्यावर निशाणा साधायचा आहे. हिज्बुलमध्ये भारतीय सैन्याकडून गुप्तहेर म्हणून गेलेल्या मेजर शर्मा यांनी आपल्या भावाला 2001 मध्ये भारतीय सैन्याकडून ठार करण्यात आल्याचं सांगत फसवलं होतं. तिथं त्यांची ओळख होती, इफ्तिखार भट्ट.


दहशतवाद्यांचाच वेश धारण करुन त्यांच्यासोबत राहण्याचं धाडस करणाऱ्या मेजर शर्मा हे 21 मार्च 2009 मध्ये ब्रावो अस़ॉल्ट टीमचं नेतृत्त्व करत असताना कुपवाडा येथे झालेल्या एका चकमकीत शहीद झाले होते. मरणोत्तर अशोक चक्र या बहुमानानं मेजर शर्मा यांचा भारत सरकारनं सन्मानही केला.

कसा जिंकलेला दहशतवाद्यांचा विश्वास ?


मेजर मोहित शर्मा यांनी हिज्बुलच्या दहशतवाद्यांसमवेत संपर्क वाढवला होता. अबू तोरारा आणि अबू सबजार अशी त्या दहशतवाद्यांची नावं असल्याचं सांगण्यात येतं. याच पार्श्वभूमीवर मेजर शर्मा यांनी त्यांची ओळख इफ्तिखार भट्ट म्हणून सांगितली. त्यांनी दहशतवाद्यांचा विश्वास असा काही जिंकला होता, की भारतीय सैन्यावर हल्ला करण्याचा त्यांचा खोटा मनसुबा दहशतवाद्यांना खरा वाटला. आर्मी चेकपॉईंटवर हल्ला करण्याचा आपला बेत असल्याचं सांगत त्यांनी यासाठीचा पूर्ण बेतही आखला होता. ज्यानंतर त्यांची मदत करण्याचं दहशतवाद्यांनी ठरवलं. दहशतवाद्यांनी त्यांना आपण अंडरग्राऊंड होणार असल्याचं सांगितलं जेणेकरुन हत्यारं आणि हल्ल्यासाठीचं सामान एकवटता येईल. जोपर्यंत आपण भारतीय सैन्यावर हल्ला करत नाही तोवर मूळ गावीही परतणार नसल्याचं इफ्तिखार भट्टचं रुप घेतलेल्या मेजर शर्मा यांनी दहशतवाद्यांना पटवून दिलं. तोरारा आणि सबजारनं या इफ्तिखारसाठी ग्रेनेडची व्यवस्था केली आणि जवळच्या गावांतून आणखी तीन दहशतवादी त्यांच्या मदतीसाठी दिले.

दहशतवाद्यांवर वार…


तोरारा आणि सबजारला मेजरवर शंका आली होती. पण, त्यावर तुम्हाला माझी शंका असेल तर मला मारून टाका असं म्हणत त्यांनी पुन्हा त्यांचा विश्वास जिंकला. मेजरनी त्यांची एके47 जमिनीवर टाकली. तोरारानं त्याच्या साथीदाराकडं पाहिलं आणि त्यांना मेजरवर विश्वास बसला. तितक्यातच ते बेसावध असताना मेजरनी संधी साधत या दोन्ही दहशतवाद्यांचा तिथेच खात्मा केला.


देशासाठीचं ‘ते’ अखेरचं ऑपरेशन…


मेजर मोहित शर्मा 21 मार्च 2009 मध्ये ब्रावो अस़ॉल्ट टीमचं नेतृत्त्व करत असताना कुपवाडा येथे चकामक झाली. त्यांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि यासोबतच आपल्या 2 सहकाऱ्यांचेही प्राण वाचवले. मेजर नेतृत्त्व करत असणाऱ्या ऑपरेशनला रक्षक असं नाव देण्यात आलं होतं. देशासाठी असामान्य कामगिरी करणाऱ्या मेजर शर्मा यांनी दोन साथीदारांचे प्राण वाचवले पण, ते मात्र वीरगतीस प्राप्त झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.