Press "Enter" to skip to content

खारघर मध्ये गोळीबार करणारे अटकेत

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।

पेण येथून नवी मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या प्रतीक रवींद्र आहेर (24) या तरुणावर शनिवारी रात्री खारघर येथे गोळीबार करुन फरार झालेल्या चारही आरोपींना अटक करण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे.

विपीन शैलेंद्र ठाकुर (19), गोपाल ननु सिंह (23), अभिनंदनकुमार गणेश शर्मा (23) आणि मुचन नागेंद्र ठाकुर (19) अशी या आरोपींची नावे असून त्यांनी लुटमारीच्या उद्देशाने प्रतीक आहेर याच्यावर गोळीबार ssकेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे लुटमारी करुन मिळालेल्या पैशातून हॉटेल सुरु करण्याची या तरुणांची योजना असल्याचे तपासात आढळुन आले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून रिव्हॉल्वर व जिवंत काडतुस जफ्त केले आहे.

या आरोपींच्या गोळीबारात जखमी झालेला प्रतीक आहेर हा तरुण पेण शहरात राहण्यास असून तो शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पेण येथून मेस्ट्रो या मोटारसायकलवरून नवी मुंबईत फिरण्यासाठी आला होता. त्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो वाशी येथून सायन पनवेल हमार्गे घरी जात असताना, रियान शाळे समोरील रस्त्यावर सिगरेट ओढण्यासाठी गेला होता. याचवेळी त्या ठिकाणी आलेल्या तिघा आरोपींनी प्रतिककडे मोबाईल, पैसे व त्याच्या मोटरसायकलच्या चावीची मागणी केली. मात्र प्रतिकने त्यांना नकार दिल्याने एकाने प्रतीक जवळचा मोबाईल फोन जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रतीकने त्यांना विरोध केल्यानंतर त्यातील एका आरोपीने प्रतीक आहेर याच्या डाव्या पायाच्या मांडीवर आपल्याकडील रिवॉल्वरने एक गोळी झाडली होती.

या गोळीबारात प्रतिक जखमी झाल्यानंतर तिघा आरोपींनी त्या ठिकाणावरुन पलायन केले होते. या घटनेची माहिती मिळ्यानंतर खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रतीक आहेर याला प्रथम खारघर मधील सिटी हॉस्पिटल व त्यानंतर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार करणाऱया आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता. त्यासाठी पोलिसांनी खारघर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र त्यांना त्यातून काहिच माहिती मिळाली नाही. अखेर पोलिसांनी कोपरा गावातील एकमेव कॅमेरा तपासला असता, त्यात गोळीबार झाल्याच्या वेळेत 4 तरुण निदर्शनास आले. सदर तरुणांबाबत पोलिसांनी अधीक माहिती घेतली असता, एक दिवसापुर्वीच तेथील चाळीमध्ये 4 तरुण राहाण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी त्या भागात सापळा लावून त्याठिकाणी आलेल्या दोघा तरुणांना ताब्यात घेतले. त्यानंतर परिमंडळ-1 चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी दोन्ही तरुणांकडे अधीक चौकशी केली असता, त्यांनी प्रतीकला लुटण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्या इतर दोघा साथिदारांना देखील अटक केली. तसेच त्यांनी ज्या रिव्हॉल्वर मधुन गोळीबार केला, ते रिव्हॉल्वर व जिवंत काडतूस देखील जफ्त केले. या आरोपींनी गोळीबार करुन लुटमारी करुन मिळालेल्या रक्कमेतून हॉटेल सुरु करण्याची योजना आखल्याचे त्यांच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगीरी महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पढार, मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार,गुहाने आदींच्या पथकाने केल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.