Press "Enter" to skip to content

फिनिक्युलर रेल्वेमुळे माथेरानला पर्यटन क्रांती घडणार !

माथेरानकरांसाठी बहुचर्चित महत्वकांक्षी फ्युनिक्युलर रेल्वे सुरु करण्याचा मार्ग खुला : एम.एम.आर.डी.ए. च्या बैठकीत झाला निर्णय

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #

नेरळ-माथेरान या आजपर्यंत केवळ एकाच मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या माथेरान करांना आणि बाराही महिने इथे नियमितपणे हजेरी लावणाऱ्या पर्यटकांना लवकरच फिनिक्युलर रेल्वेच्या माध्यमातून एक नवीन पर्यायी व्यवस्था उपलब्ध होणार असल्याने सध्यातरी स्थानिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माथेरानकरांसाठी बहुचर्चित महत्वकांक्षी फ्युनिक्युलर रेल्वे सुरु करण्याचा मार्ग खुला झाला असून काही दिवसांपूर्वी एम.एम.आर.डी.ए. च्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.गेल्या अनेक वर्षांपासून माथेरानसाठी पर्यायी मार्ग असावा ह्यासाठी माथेरानकर संघर्ष करीत होते पण शासन दरबारी त्यास योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता,काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी पनवेल मार्गे धोदानी ते माथेरान ह्या दरम्यान फ्युनिक्युलर रेल्वे सुरु व्हावी ह्यासाठी २००७ मध्ये मागणी केली होती व ती मान्यही करण्यात येऊन ह्या भागाचा सर्व्हे सुध्दा करण्यात आला होता व ह्या फिजिबिलिटी रिपोर्ट साठी तब्बल सत्तर लाख इतका निधीही वापरला गेला होता पण हा रायगड जिल्ह्यातील जवळपास दीडशे कोटी रुपयांचा सर्वात मोठा प्रकल्प माथेरान मध्ये मनोज खेडकर यांच्या प्रयत्नांमुळे कार्यान्वित होणार होता त्यामुळेच इथल्या काही तसेच तालुक्यातील काही राजकीय मंडळींनी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून केवळ मतांच्या लालसेपोटी अप्रत्यक्षपणे त्यास खोडा घातला होता त्यामुळे हा प्रकल्प बासनात गुंडाळून त्यावेळी रोप-वे ला प्राधान्य देण्यात आले पण तो प्रकल्प सुध्दा कासवाच्या गतीने पुढे सरकत असल्याचे निदर्शनास येत आहे हा प्रकल्प सध्या ज्यांच्यामार्फत सुरु आहे त्यांना हा पुढे सुरु ठेवण्यास कोणताही स्वारस्य नसल्याचेच नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे माथेरानकर कोणत्याही स्थितीत पर्यायी मार्ग असावा ह्या करिता आग्रही दिसून येत होते त्यामुळे येथील स्थानिकांनी दोन वेळा श्रमदान करून पर्यायी मार्ग करण्यासाठी प्रयत्न करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला व ह्या दरम्यान माथेरानमधील विविध लोकांनी पर्यायी मार्गासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला होता पण माथेरानकरांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून नगरपालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी केले गेलेल्या प्रयत्नांना फलित म्हणून दि.७ जुलै रोजी एम.एम.आर.डी.ए.चे अध्यक्ष मा.ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दूरचित्रसंवादाद्वारे झालेल्या बैठकीत माथेरान फ्युनिक्युलर रेल्वे खाजगी,भागीदारी,व पीपीपी तत्वावर मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . ह्या बैठकीस माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत सामील होऊन त्यांनी माथेरानकरांची बाजू मांडली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास माथेरान मध्ये मुंबई मार्गे येणाऱ्या पर्यटकांचा एक तासाचा वेळ वाचणार असून येथील मालवाहतूक प्रश्नही काही अंशी कमी होणार आहे हा प्रकल्प माथेरानच्या पर्यटनमध्ये क्रांती आणणार असून रायगड जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प असल्याने पर्यटकांचा ओढाही वाढणार आहे तर नेरळ माथेरान घाट रस्त्यामध्ये पर्यटन हंगामामध्ये होणारी वाहतूक कोंडीपासून पर्यटकांची कायमस्वरूपी सुटका होणार आहे हा प्रकल्प व्हावा ह्या करिता माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, अजय सावंत,सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पार्टे व इतर अनेकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानेच लवकरच हा प्रकल्प सुरु होऊन माथेरान साठी नवीन विकासाची कवाडे खुली करणार आहे.

More from रायगडMore posts in रायगड »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.