Press "Enter" to skip to content

अजिंक्यतारा

अजिंक्यतारा

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारून जो पराक्रम केला ते पाहून मराठमोळ्या अजिंक्यचे मनापासून कौतुक! या निमित्ताने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा आढावा

२७ डिसेंबर २०२० दुपारची वेळ होती. आमच्या घरी शेजारचे आणि घरातले क्रिकेटप्रेमी social distancing ठेवून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मधल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या कसोटीचा आस्वाद घेत होते. अचानक एकच चित्कार झाला आणि सर्व श्रोत्रावृंद “ century झाली, century झाली” ओरडत गणपती स्पेशल डान्स करू लागले, औचित्य होते अजिंक्य रहाणे याच्या शतकाचे. मराठ्यांचा “ अजिंक्यतारा” पुन्हा एकदा झळाळून उठला.
एक अजिंक्यतारा म्हणजे अभेद्य असा छत्रपती शिवरायांचा गिरीदुर्ग आणि दुसरा अजिंक्यतारा म्हणजे क्रिकेटच्या आसमंतातील एक अढळ तारा.
पहिला अजिंक्यतारा हा सातारा जिल्हातील ४४०० उंचीचा बाणमोली पर्वतरांगावर वसलेला दुर्ग. मराठयांची ‘चौथा गड’/ चौथी राजधानी म्हणून अजिंक्यतारा प्रसिद्ध होता. पहिला राजगड, दुसरा रायगड, तिसरा जिंजी आणि चौथा अजिंक्यतारा. शिवरायांच्या चरणस्पर्शने पावन झालेला, परकीय आक्रमण निधड्या छातीने झेलणारा, छत्रपती शिवाजीमहाराजा पासून ते छत्रपती शाहु महाराजा पर्यंतच्या मराठ्यांच्या इतिहासाचा साक्षीदार.
दुसरा अजिंक्यतारा म्हणजे अजिंक्य रहाणे, हा भारतीय क्रिकेमधील मधल्या फळीतील उजव्या हाताचा फलंदाज. कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाचा कप्तान. कसोटी क्रिकेट सामन्यातील ‘चौथा गडी’. संयमी, स्थितप्रज्ञ आणि विचारी खेळाडू.
अजिंक्य रहाणे याचा जन्म ६ जून १९८८ मध्ये आश्वी, संगमनेर ( महाराष्ट्र) येथे झाला. वडिलांचं नाव मधुकर, आईचे नाव सुजाता. घरी एक लहान भाऊ शशांक आणि लहान बहीण अपूर्वा. त्याचे शिक्षण एस. व्ही. जोशी हाई स्कूल, डोंबिवली मधून झाले. २०१४ मध्ये अजिंक्य हा त्याची बालपणीची मैत्रीण राधिका धोपवकर हिच्याशी विवाहबद्ध झाला आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये उभयतांना एक कन्यारत्न प्राप्त झाले.
वयाच्या ७ व्या वर्षी अजिंक्य रहाणे याने डोंबिवली, मुंबई येथे क्रिकेट प्रशिक्षणास सुरुवात केली. १७ व्या वर्षी भूतपूर्व भारतीय फलंदाज प्रवीण आंब्रेच्या मार्गदर्शनाखाली रीतसर प्रायोगिक प्रशिक्षण सुरू झाले. २००७ मध्ये भारतीय U१९ सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे वयाच्या १९ व्यां वर्षी त्याचे प्रथम श्रेणीच्या क्रिकेट सामन्यात मध्ये पदार्पण झाले. पदार्पणातच त्याने शतक झळकावले. पुढे मोहंमद निसार ट्रॉफी, इराणी ट्रॉफी, रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी ही त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजवल्या.
मार्च २००७ मध्ये त्याने रणजी ट्रॉफी एक दिवसीय सामन्यांत मुंबईतर्फे पदार्पण केले. उदयोन्मुख खेळाडूंच्या ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या सामन्यात त्याने लागोपाठ दोन शतक फटकवून भारतीय आंतरराष्ट्रीय एक दिवसीय संघात स्थान पटकावले. त्याने २०१८-१९ मध्ये विजय हजारे ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफी सामन्यात कप्तानाची भूमिका यशस्वीपणे पार पाडली.
मार्च २०१३ मध्ये गौतम गंभीर आणि शिखर धवनच्या अनुपस्थतीमुळे मुळे रहाणे याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली, मात्र यात सामन्यांत भरीव कामगिरी करण्यास त्यास अपयश आले. त्यानंतर च्या २०१३-१४ मधील साऊथ आफ्रिका विरुद्धच्या कसोटी सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करून त्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. २०१४ मध्ये त्याने कसोटी मधील पाहिले शतक न्यूझीलंड विरुद्ध आणि दुसरे शतक इंग्लंड विरुद्ध झळकावले. २०१४-१६ मध्ये झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी, श्रीलंका क्रिकेट मालिका यात चांगली कामगिरी केल्याबद्दल त्याला विराट कोहली च्या अनुपस्थतीमुळे मार्च २०१७ मध्ये भारतीय कसोटी सामन्यांत कप्तनाची भूमिका पार पाडण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०१७-१९ मध्ये झालेल्या अफगाणिस्तान, साऊथ आफ्रिका, बांगलादेश विरुद्ध कसोटी सामन्यांत त्याने महत्वपूर्ण भूमिका बजावली. आता सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात त्याने कप्तानाची भूमिका बजावत उत्कृष्ट फलंदाजी केली.
एकदिसीय क्रिकेट सामन्यात त्याचा प्रवेश २०११ मध्ये झाला. परंतु या इंग्लंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका, पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय सामन्यात भरीव कामगिरी करता आली नाही.त्याने ऑगस्ट २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात पदार्पण केले. २०१४ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांत त्याने भारतीय संघात स्थान पटकावले.
आयपीएल मध्ये २००८-२०१० पर्यंत रहाणे मुंबई इंडियन्स तर्फे खेळला, मात्र २०११-२०१५ मध्ये त्याची राजस्थान रॉयल्सच्या संघात वर्णी लागली. राजस्थान रॉयल्स मधील राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली त्याची फलंदाजी बहरली. त्यानंतर २०१६-१७ मध्ये तो रायझिंग पुणे supergiant मधून आयपीएल खेळला आणि २०१८-१९ मध्ये परत राजस्थान रॉयल्स मध्ये पुनरागन केले. मात्र २०१८ मध्ये म्हणावं तसें फलंदाजी प्रदर्शन करता आले नाही.२०२० मध्ये त्याची देल्हीं कॅपिटल मध्ये निवड झाली, मात्र सुरुवातीच्या काही सामन्यांत संघात सामील होता आले नाही. शेवटच्या काही सामन्यात संधी मिळाली तेव्हा त्याने धावफलक हलता ठेवण्यास मदत केली.
त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आणि पुरस्कारही नमूद आहेत. त्याने आता पर्यन्त कसोटी मध्ये ४४१०, एकदिवसीय सामन्यात २९६२, टी २० आंतरराष्ट्रीय ३७५ आणि प्रथम श्रेणीच्या क्रिकेट सामन्यात १०७३१ धावा केल्या आहेत.
बीसीसीआई टेस्ट रँकिंग मध्ये त्याने आता पहिल्या १० मध्ये स्थान पटकावलं आहे. अजिंक्य रहाणे च्या नेतृत्वाखाली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही कसोटी आपण विराट कोहली, बुमराह, आश्विन यांच्या अनुपस्थित जिंकली. नव्या दमाच्या सिराज, सुंदर, नटराजन, ठाकूर, शुभमन गिल आणि पंत यांच्या साथीने ऑस्ट्रेलियाला गब्बा येथे तिन दशकानंतर पराभवाचा सामना करावा लागला.
अश्या या आपल्या शांत, संयमी, नेतृत्वगुण असणाऱ्या मराठमोळ्या “ अजिंक्यतारा”ला त्याच्या आता पर्यन्तच्या भारतीय क्रिकेटमधील भरीव कामगिरीसाठी आभिनंदन आणि पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा.

डॉ.श्रद्धा नाईक, आबुधाबी (यु.ए.ई.)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.