Press "Enter" to skip to content

कर्जत तालुक्यात श्री राम मंदिर निर्माण अभियान सुरू

‘राम मंदिर म्हणजे राष्ट्राच्या बंधुत्वाचे, चारित्र्याचे व एकतेचे प्रतीक उभे राहणार आहे. : राघुजीराजे आंग्रे

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

‘श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन करण्याची वेळ यावी ही आनंददायी की खेदाची बाब आहे हे कळत नाही. देशात लाखो मंदिरे उभी आहेत मग हे मंदिर कशासाठी असे प्रश्न ही उपस्थित होत आहेत. याबाबत सांगायचे तर श्रीराम आपल्या कणाकणात आहे. ईश्वराचे एक मूळ स्थान आहे. श्रीराम हा राष्ट्राचा आत्मा आहे. हा त्याचा गर्भितार्थ आहे. पाचशे वर्ष लागलेला कलंक आपल्याला पुसायचा आहे. यासाठी अनेकांचे बलिदान आहे. राम मंदिर म्हणजे राष्ट्राच्या बंधुत्वाची , चारित्र्याचे, एकतेचे, संस्काराचे प्रतीक उभे राहणार आहे.’ असे स्पष्ट प्रतिपादन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पंधरावे वंशज रायगड जिल्हा संघचालक रघुजीराजे आंग्रे यांनी येथे केले.

अयोध्येत श्री रामांचे भव्य असे मंदीर उभे राहत आहे आणि या करिता सर्व देशभर श्री राम मंदिर निर्माण अभियान सुरू आहे त्याच प्रमाणे कर्जत तालुक्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत अभियान राबवले जाणार आहे. त्याची सुरुवात म्हणून विठ्ठलनगर मधील सावली सोसायटी मध्ये श्री राम मंदिर निर्माण संपर्क अभियान कर्जत तालुक्याच्या वतीने संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्जत तालुक्यातील अभियान कार्यलयाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा संघचालक रघुजीराजे आंग्रे तर प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल तालुका संघचालक विनायक चितळे, तालुका अभियान प्रमुख दिनेश रणदिवे व्यासपीठावर उपस्थित होते.

आंग्रे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे बोलताना, ‘ आपली पिढी भाग्यवान आहे. आपल्याला श्रीराम मंदिर उभारणी पहाण्याचा योग आहे. काही जण यापूर्वी श्रीराम मंदिरासाठी विटा जमा केल्या त्यावेळीही निधी गोळा केला होता त्याचे काय झाले? असे विचारतात. त्याचे उत्तर म्हणजे त्या निधी संकलनातून गेली वीस – बावीस वर्ष श्रीराम मंदिर उभारणी साठी चिरे कोरण्याचे काम कार्यशाळेत रात्रंदिवस सुरू आहे. त्याचे हिशेब सुध्दा आहेत ते कुणालाही बघता येतील. कुणी कितीही ठरवलं तर राम बनणे शक्य नाही. खरे तर अकराशे – बाराशे कोटी रुपयांचे मंदिर कोणतीही धनाढ्य व्यक्ती बांधून देईल परंतु तसे न करता श्रीराम मंदिर उभारणी ही अनेक पिढ्यांची ईच्छा आहे ती आता त्यांच्या सहभातून पूर्ण होत आहे.’ असे स्पष्ट केले. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी आपल्या मनोगतात,’ श्रीराम मंदिर उभारणी व्हावी अशी माजी नगरसेवक कै. अंनतकाका जोशी यांची इच्छा होती. त्यांच्या स्मरणार्थ एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश मंदिर उभारणीसाठी देत आहे.’ असे जाहीर करून धनादेश अभियान प्रमुख दिनेश रणदिवे यांच्याकडे स्वाधीन केला.

जैन श्वेतांबर समाजाच्या वतीने एकवीस हजार रुपयांचा धनादेश आणि सतीश दत्तात्रेय श्रीखंडे यांनी अकरा हजार रुपयांचा धनादेश दिला. प्रारंभी बळीराम डोंगरे यांनी अभियान गीत सादर केले. महेश निघोजकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तालुका संघचालक विनायक चितळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. विहिंप प्रखंड मंत्री विशाल जोशी यांनी प्रास्ताविक केले. कुलाबा जिल्हा बजरंग दल संयोजक साईनाथ श्रीखंडे यांनी सूत्र संचालन केले. पसायदानाने समारंभाची सांगता करण्यात आली.

याप्रसंगी नगरसेविका संचिता पाटील, स्वामिनी मांजरे, माजी नगरसेवक भालचंद्र जोशी, अवीनाश उपाध्ये, केतन जोशी, दीपक बेहेरे, ठमाताई पवार, दिनेश बोरसे, राहुल वैद्य, जयंतीलाल परमार, संजीव दातार, मिलिंद खंडागळे, योगेश चोळकर, केदार भडगावकर, अनंत हजारे, रवींद्र खराडे, भारती म्हसे, गायत्री परांजपे, शर्वरी कांबळे, स्नेहा गोगटे, संजीव दातार आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.