Press "Enter" to skip to content

माथेरान मध्ये गरजवंतांना मदतीचा ओघ सुरूच

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।

कोरोना काळात मुंबई पुण्यातील अनेक सेवाभावी संस्थांनी माथेरान सारख्या या दुर्गम भागात जीवनावश्यक वस्तूंच्या केलेल्या वाटपामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून सरसकट सर्वांनाच मोठया प्रमाणावर आधार दिला होता.

तद्नंतर सुध्दा २ सप्टेंबर रोजी माथेरान अनलॉक केल्यानंतर पर्यटकांनी इथे मोठया प्रमाणात गर्दी केल्यामुळे सर्वांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले होते. परंतु ज्यांची घरचीपरिस्थिती हलाखीची आहे अशा एकूण ४०० गरजवंतांना पुण्यातील टेक महेंद्र फाउंडेशन आणि उर्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ रोजी तावडे सदन येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

टेक फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना दिवाडकर,उर्मी फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल शेंडे आणि या दोन्ही संस्थांचे सदस्य मनोज सकते,प्रिया कुलकर्णी, संदिप पंडित, श्रीपाद सोमण, अभिमन्यू डोईफोडे, आदी उपस्थित होते. माथेरान नगरपरिषद गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये माथेरान मधील गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष प्रवीण सकपाळ, डी गृपचे अध्यक्ष किरण चौधरी, आरिफ चिपाडे, माथेरान युथ सोशल क्लबचे अध्यक्ष प्रशाम दिवाडकर,प्रशांत बेलोसे यांनी या वाटप कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून आजवर एकूण आठ विविध जिल्ह्यात १५००० किट्स वाटप करण्यात आले आहेत.दर शनिवार आणि रविवार या दिवशी विविध ग्रामीण भागात गरजवंतांना हे वाटप करण्यात येत असून भंडारा, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रायगड जिल्ह्यातील आदिवासींच्या घरी जाऊन त्याचप्रमाणे महाबळेश्वर येथील सर्वसामान्य गरजवंत जनतेला, सोलापूर येथील विडी कामगार, पुण्यातील लोककलावंत, मिलिटरी कामगार वर्ग तसेच अंध, अपंग, कुष्ठरोगी यांना हे वाटप करण्यात आले आहे.

केवळ मनुष्याच्या साठी ह्या संस्था कार्यरत नसून प्राण्यांच्या साठी सुध्दा पुढाकार घेत आहेत.माणिकडोह जुन्नर येथील बिबट्या निवारा केंद्रातील प्राण्यांना औषधांचे वाटप केले आहे.एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ह्या दोन्ही संस्था कार्यरत असल्याने माथेरान सारख्या या दुर्गम स्थळी येऊन गरजवंतांना मदतीचा हातभार लावल्याबद्दल नगरपरिषद गटनेते प्रसाद सावंत यांनी सर्वांचे आभार मानून या संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी समस्त माथेरान वासीयांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.