सकाळ भवन ते पाम बीच मार्गावरील नो पार्किंग चा ताण लगतच्या रस्त्यांवर
बाजूच्या रस्त्यांवर लागत आहेत वाहनांच्या चार चार रांगा : आपत्कालीन वाहने जाण्यास होतो अडथळा
सिटी बेल लाइव्ह । बेलापूर ।
बेलापूर मधील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा मार्ग म्हणजे सकाळ भवन ते पाम बीच मार्ग.या दरम्यानच्या रस्त्यावर वाहने उभी करण्यास प्रशासनाच्या वतीने मज्जाव करण्यात येत असल्या मुळे या रस्त्यालगतच्या जोडरस्त्यांवर वाहनांच्या चार-चार रांगा लागल्या असल्याचे विदारक दृश्य सध्या बेलापूर मध्ये दिसत आहे. वाहतुक पोलीसांचा मुख्य रस्ता मोकळा ठेवल्याचा दिखावा म्हणजे वरून “किर्तन आतुन तमाशा” असेच म्हणावे लागेल.
व्यापारी दृष्टिकोनातून पाहिल्यास या पट्ट्यात शो रूम्स,हॉटेल,बार,कॉर्पोरेट ऑफिसेस,फूड जॉईंट,चेन रेस्टॉरंट असल्यामुळे बारमाही वर्दळ असते.येथे येणारे नागरिक गाड्या पार्क करण्यासाठी आजूबाजूच्या जोड रस्त्यांचा आसरा घेत आहेत.
दौशा राम म्हात्रे मर्गासह काही समांतर रस्ते सकाळ भवन ते पाम बीच मधील मार्गाला जोडले गेले आहेत.या रस्त्यांवर अनेक कार्यालये आणि निवासी संकुले आहेत. परंतु याच जोड रस्त्यांवर अनेक पब्ज, बार,रेस्टॉरंट आणि फूड जॉईंट आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणार्या लोकांच्या वाहनांची गर्दी जोड रस्त्यांवर होत असते. सकाळ भवन वर असणारी रेस्टॉरंट बार आणि शोरूम्स या ठिकाणी येणारे नागरिक देखील त्यांची वाहने जोड रस्त्यावर उभी करत असतात.
बेलापूर च्या शेजारी असणारे खारघर आणि उलवे नोड याठिकाणी नो लिकर झोन असल्या कारणामुळे येथील तळीराम सकाळ भवन मार्गावरील रेस्टॉरंट अँड बार मध्ये गर्दी करत असतात.अर्थातच नो पार्किंग मुळे येथे येणारे तळीराम जोड रस्त्यांवर बेशिस्तपणे पार्किंग करून रस्ता अडवून ठेवतात. जोड रस्ते प्रशस्त असले तरीदेखील रस्त्याच्या दोन्ही मर्गिकांवर दुतर्फा पार्किंग करण्यात येते. विशेष म्हणजे या जोड रस्त्यांवर गरड हॉस्पिटल सारखी अनेक छोटी इस्पितळे देखील आहेत. हॉस्पिटल्समध्ये येणाऱ्या रुग्णवाहिकाना या वाहनांमधून मार्ग काढत पोहोचावे लागते. जोड रस्त्यांवरील निवासी संकुलांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी लागणारी रुग्णवाहिका, अग्निशामन वाहने, रेस्क्यू व्हॅन्स,स्फोटके निकामी करणारी वाहने या रस्त्यांवरून कशी काय पोहोचणार? असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत आहेत.
एकंदर सध्याची परिस्थिती पाहता सकाळ भवन ते पाम बीच मार्ग यावर किमान सम विषम तारखेनुसार पार्किंग करण्यास अनुमती देणे हेच योग्य ठरेल असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

Be First to Comment