मास्क
नाकावरचा घट्ट मास्क सोडवत नाही
कधी घेतला होता शेवटचा मोकळा श्वास?
नाहीच आठवत तेही
तशी आता श्वास घ्यायचीच भीती वाटू लागलीय
श्वास म्हणजे? – शुद्ध हवा आत घेणं
नाही! चुकलीच व्याख्या –
जुन्या गोष्टी आता चालत नाहीत
अरे! हा इतिहास झाला श्वासांचा,
आता फार प्रगती झाली आहे
श्वास म्हणजे एक समीकरण बनलंय भलंमोठं
धूलिकण, दूषित वायू आणि सूक्ष्म जीवजंतू
नेमके किती प्रमाणात आत ओढायचे,
म्हणजे एक श्वास होईल?
गणित सोडवायलाच हवं श्वासांचं
नाहीतर असलीच जर कुठल्या कोनाड्यात तगून राहिलेली झाडं
तर हसतील आपल्यावर
आपणच जगू देत नाही त्यांना जळफळापोटी,
नाहीतर त्यांच्यासाठी काळा वायुसाठा भरपूर आहे इथे
नाही फक्त जमीन – पाय रोवून उभे राहण्यासाठी
आणि आपण,
आपण उजाड जमीन बनवून घेतोय स्वतःसाठी
प्राणवायूच्या शोधात सैरावैरा पळता यावं म्हणून
सृष्टी गुजराथी, कर्जत
Be First to Comment