Press "Enter" to skip to content

नर्मदे हर हर म्हणत.. जेएनपीटी कामगारांची बुलेटवरून नर्मदा परिक्रमा

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।

जेएनपीटीचे कामगार प्रकाश चंद्रकांत नाईक, प्रदीप घरत, सुनील घरत व भालचंद्र ठाकूर ह्यांनी नुकतीच बुलेटने(दुचाकी वाहनाने ) नर्मदा परिक्रमा पूर्ण केली.

हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानली जाणारी नर्मदा परिक्रमा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी करावी अशी मान्यता आहे. 1312 किलोमीटर लांबीची नर्मदा नदी हि भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी असून ती मध्य प्रदेशात अमरकंटक येथे उगम पावत गुजरातच्या भरूच शहरालगत मिठीतलाई येथे समुद्राला मिळते.
3500 किलोमीटर लांबीची हि परिक्रमा मुख्यतः पायी केली जाते. त्याकरिता 3 वर्षे 3 महिने व 13 दिवस लागतात.

एवढी रजा मिळणे शक्य नसल्याने वरील चौघांनीही बुलेटवरून नर्मदा परिक्रमा करण्याचे ठरविले. परिक्रमेत अनेक नियमांचे काटेकोर पालन करावे लागते जसे कोठेही नर्मदा नदी ओलांडायची नाही. जर नर्मदा ओलांडली तर परिक्रमा खंडित होते. तसेच अत्यंत कमी साधनांमध्ये हि परिक्रमा पूर्ण करायची असते जसे फक्त २ जोडी कपडे, झोपायला अडीच बाय सहाचा फोमचा तुकडा, ताटवाटीपेला, पांघरायला शाल किंवा चादर, पाण्यासाठी कमंडलू किंवा स्टीलचा कडीवाला डब्बा, औषधे व नर्मदा मातेच्या पूजनाचे साहित्य. हे सर्व एका झोळी मध्ये किंवा पाठीवरच्या सॅक मध्ये भरायचे व परिक्रमेला निघायचे.

बुलेटने परिक्रमा करताना चौघांनीही जास्तीतजास्त नियमांचे पालन केले. लॉकडाउन मुळे राहण्याची व भोजनाची गैरसोय होऊ नये म्हणून सोबत तंबू व थोडे डाळ तांदूळ घेऊन परिक्रमेला सुरुवात केली. पहाटे 4 वाजता उठून नर्मदा स्नान करणे, नसेल तर नळ, विहीर, बोअरवेलवर आंघोळ करणे. नित्य दोन वेळा नर्मदा मातेची पूजा आरती सुरु होती. ह्यात कधी खंड पडू दिला नाही. आश्रमात किंवा मंदिरात जेथे सोय होईल तेथे राहणे व मिळेल तो प्रसाद ग्रहण करणे हे कटाक्षाने पाळले. हॉटेलिंग करायची नाही हे आधीच ठरलेले होते.नर्मदा परिक्रमा हि अमरकंटक (उगमस्थान), ओंकारेश्वर किंवा भरूच जेथे नर्मदा समुद्राला मिळते अश्या कुठूनही सुरु करता येते पण तिची सांगता मात्र ओंकारेश्वरालाच होते. त्यामुळे आम्ही ओंकारेश्वर येथूनच परिक्रमा करण्याचे ठरविले असे प्रकाश नाईक ह्यांनी सांगितले.

महंत मंगलदास त्यागी महाराज ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हि परिक्रमा सुरु झाली. उदासीन आखाड्याचे बाबा भोलादास (सरस्वती घाट, बेडाघाट) ह्यांचेही मार्गदर्शन लाभले.

संकल्प करते वेळी माता नर्मदेचे पवित्र जल एका बाटलीत भरून घेतात. त्याची नित्य पूजाअर्चा करतात. समुद्र संगम व उगमस्थानी बाटलीतले थोडे जल अर्पण करून तेवढेच नवीन पाणी भरतात व पुढे ओंकारेश्वर व ममलेश्वर यथे ज्योतिर्लिंगावर ह्या पाण्याने अभिषेक केला की आपली परिक्रमा पूर्ण होते. ह्यावेळी कन्या पूजन व कढई प्रसाद करण्याची प्रथा आहे.

नर्मदा मातेच्या किनारी असंख्य मंदिरे व आश्रम असून अनेक साधूसंत महात्मे तपश्चर्येंत लिन आहेत. शक्य तितके दर्शन घेणे, सत्संग करणे हे आवश्यक असते. महंतांनी सुरुवातीलाच परिक्रमेचा मार्ग आखून दिला होता त्याप्रमाणेच रोजच्या प्रवासाचे नियोजन होत होते. भालचंद्र ठाकूर ह्यांनी नियोजन व सुनील घरत ह्यांनी तांत्रिक बाजू सांभाळल्या. ह्या कामी प्रदीप घरत ह्यांनी सहकार्य केल्याचे JNPT चे कर्मचारी प्रकाश नाईक ह्यांनी सांगितले.अशा प्रकारे या JNPT च्या कर्मचाऱ्यांनी 12 दिवसात 3500 किमीची परीक्रमा पूर्ण केले.व ओंकारेश्वर ते JNPT असा 1200 किमीचा परतीचा प्रवास केला असे एकूण 4700 किमीचा राईड (प्रवास )करून या कर्मचाऱ्यांनी अध्यात्मिक आनंदात सहभाग घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.