Press "Enter" to skip to content

पनवेल बसस्थानक नूतनीकरण काम सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा

पनवेल बस आगार नूतनीकरण कामाला लवकरात लवकर सुरुवात करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मागणी

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।

राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल येथील बस आगाराच्या नूतनीकरणाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली असून काम सुरु न केल्यास भारतीय जनता पार्टीच्यावतीने आंदोलन करण्याचा ईशाराही त्यांनी दिला आहे.

या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी नामदार अनिल परब यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, राज्य परिवहन महामंडळाच्या अतिशय महत्वाचे मानले जाणारे पनवेल येथील बस आगाराच्या नुतनीकरणाच्या कामाला मंजूरी मिळून बराच कालावधी होवून अद्यापपर्यंत कामाला सुरुवात झालेली नाही. अतिशय दयनीय अवस्थेत असलेल्या पनवेल बस आगार अनेक प्राथमिक पायाभूत सुविधांपासून वंचित असल्याने प्रवाशांना व नागरिकांना अनेक गैरसोयीना सामोरे जावे लागत आहे.

कोविड १९च्या पूर्वी तसेच कोविड १९ च्या काळात जवळपास दोन वर्षे बस आगाराच्या नुतनीकरणाचे काम सुरू होवू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे . परंतु सद्यस्थितीत सर्वच व्यवहार व विकासकामे सुरू असून पनवेल बस आगाराच्या नुतनीकरणाचे काम सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.

बस आगाराच्या नुतनीकरणाच्या कामासंदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून मी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करूनसुद्धा संबंधीत विभागाच्या दुर्लक्षामुळे बस आगाराचे नुतनीकरणाचे काम अद्यापही प्रलंबित आहे. नागरिकांची व प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता पनवेल बस आगाराच्या नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे अन्यथा भारतीय जनता पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यास आपण भाग पाडाल व सदर आंदोलनातून उदभवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार असेल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.