Press "Enter" to skip to content

कोरोना काळातील पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद


अंजुमन संस्थेने महाडच्या पत्रकारांना केले सन्मानित


सिटी बेल लाइव्ह । महाड । रघुनाथ भागवत ।

कोरोना काळामध्ये समाजातील इतर घटकांबरोबरच पत्रकारांनी देखील जीव धोक्यात घालून काम केलेले असून पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत महाड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक वजीर कोंडीवकर यांनी महाडमधील पत्रकारांच्या कोरोना योद्धा सन्मानित सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.

कोरानाच्या आपत्काळीन परिस्थितीत टाळेबंदीमुळे प्रभावित झालेल्यांना सदैव मदतीचा हात पुढे करणाऱ्या सामाजिक संस्थांमधील अग्रगण्य संस्था अंजुमन इमदादुल मुस्लिमीन दाभोळ या संस्थेकडून महाड शासकीय विश्रामगृह येथे महाडमधील पत्रकारांचा कोरोना योद्धा सम्मानित सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष मुफ्ती अजगर खोपटकर, मौलाना सलाम जलाल, अखलाख गोडमे, अ.सत्तार तरे, मुजम्मिल माटवणकर, अब्दुल अलीम माठवणकर आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकारांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा अंजुमन इमदादुल मुस्लिमीन दाभोळ या संस्थेच्या वतीने होत असलेला सन्मान सोहळा ही देखील कौतुकाची बाब असल्याचे अखलाख गोडमे यांनी सांगितले, तर पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारांनी देखील कोरोना संक्रमण काळामध्ये जीव धोक्यात घालून काम केलेले असल्याने त्यांचा गौरव होणे गरजेचे असल्याचे सांगत अंजुमन इमदादुल मुस्लिमीन दाभोळ या संस्थेच्या वतीने समाजातील विविध घटकांच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जाणार असल्याचे देखील संस्थेचे अध्यक्ष मुक्ती अजगर खोपटकर यांनी यावेळी सांगितले.

तर महाड मधील तारिक गार्डन इमारत कोसळल्यानंतर सर्वात पहिले मदतीचे कार्य आमच्या संस्थेने सुरु केले, मात्र रायगड जिल्हाधिकारी यांना आमच्या संस्थेचा गौरव करावा असे वाटले नाही, ही शोकांतिका त्यांनी बोलुन दाखवली. तर आमचे कार्य हे मानवतेच्या मार्गाने चालणारे असून कोरोनाच्या भयान परिस्थितीमध्ये समाजातील लोकांसाठी आपण पत्रकारांनी केलेले कार्य अतुलनीय असून आपल्या मोलाच्या कामगिरीमुळे सर्वांसमोर मानवतेचा एक नवीन आदर्श ठेवला आहे.

आपल्या शौर्याला व मानवतेला या अंजुमन संस्थेने सलाम करीत कोरोना योद्धा म्हणून महाडमधील महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष महेश शिंदे, सचिव रोहित पाटील, कार्याध्यक्ष सिकंदर अन्वारे, खजिनदार दीपक साळुंखे, सहसचिव निलेश लोखंडे, प्रसिद्धीप्रमुख रघुनाथ भागवत, पत्रकार चंद्रकांत कोकणे, उदय सावंत, सुधीर सोनार, मिलिंद माने, गोपाळ कांबळे, राजेंद्र जैतपाळ, नितेश लोखंडे, राजेंद्र मांजरेकर, योगेश भामरे, मनोज चेंडेकर आदी पत्रकारांचा तसेच डॉ. हुजेफा गोडमे, डॉ.अब्दुल्ला चौधरी यांचा देखील कोरोना योध्दा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यांत आले. यावेळी पत्रकार निलेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकारांना सरकार कडून कोणतेही अभय मिळत नसल्याची खंत व्यक्त केली, तर निलेश लोखंडे यांनी आयोजक संस्थेचे आभार मानून संस्थेच्या कार्याचा शाब्दिक गौरव देखील केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.