प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विविध उपक्रम
सिटी बेल लाइव्ह । मुंबई ।
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व अनेक तालुक्यात रक्तदान शिबीर, रूग्णांना फळं वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपन, गरीब व गरजूना फळं वाटप, व्याख्याने, स्पर्धा, कोविड योद्धांचा सन्मान असे विविध उपक्रम राबवून संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र ६ जानेवारी/ १८३२ रोजी सुरू केल्याने त्यांच्या कार्याची आठवण राहावी यासाठी त्यांचा जन्मदिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, पर्यावरण जनजागृती, व्याख्याने, फळ वाटप, कोविड योद्धांचा सन्मान अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून आपल्या जीवाची पर्वा न करता देशभरात घडणा-या घटनांची माहिती,अन्याय-अत्याचार व भ्रष्टाचार अशा अनेक प्रश्नाना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करित आहेत परंतु काही असामाजिक तत्वांकडून पत्रकारांवर हल्ले केले जात आहेत ते निंदणीय आहे. यापुढे पत्रकारांवर हल्ले कराल तर याद राखा अशा कडक शब्दांत संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांनी इशारा दिला आहे.
पत्रकारांचे संरक्षण करणे, पत्रकारांसाठी विविध योजना राबविणे, पत्रकारांच्या कुटुंबाना सहकार्य करणे, पत्रकारांवरील हल्ले थांबवणे, पत्रकारांना आरोग्यविषयक सुविधा पुरविणे, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत करणे, पत्रकारांचे कल्याण व उत्कर्ष करणे, पत्रकार संरक्षण कायद्याची योग्य अमलबजावणी होण्यासाठी पुढाकार घेणे, पत्रकार व त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे, पत्रकारांना येणा-या अडचणी, समस्या सोडविणे अशा विविध उद्देशपुर्तीसाठी संघ कार्यरत आहे.
महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला असल्याने संस्थापक अध्यक्ष, राज्य पदाधिकारी यांनी सर्व विभागीय पदाधिकारी व सदस्य, सर्व जिल्हा पदाधिकारी व सदस्य, सर्व तालुका पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे.
Be First to Comment