Press "Enter" to skip to content

उरण तालुक्याने राज्यात मारली बाजी

100 टक्के घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा करणारा उरण तालुका ठरला राज्यात पहिला

सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । धनंजय कवठेकर ।

प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबावणी करण्यात येत असून, जिल्ह्यातील उरण तालुक्यात 100 टक्के घरांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे 100 टक्के घरांना नळाने पाणी पुरवठा करणारा उरण तालुका राज्यात प्रथम ठरला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात उरण तालुक्यात नळ कनेक्शन जोडणीच्या उद्दिष्टांच्या 238.10 टक्के काम करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन आहे, त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना नळ कनेक्शन देण्यात येत आहे. योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात उल्लेखनीय काम करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. वेंगुर्लेकर, उरण पंचायत समिती गट विकास अधिकारी निलम गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी यांनी योग्य नियोजन केल्याने उरण तालुका राज्यात 100 टक्के घरांना नळ कनेक्शन देणारा पहिला तालुका ठरला आहे.

जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

जलजीवन मिशन अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात घराघरात नळ कनेक्शन देण्यात येणार असून, उरण तालुक्यातील सर्व घरांमध्ये नळ कनेक्शन देण्यात आले आहे. या तालुक्यात जर कुणी नव्याने घर बांधले असेल किंवा एखादे कुटुंब कामानिमित्त तालुक्यात नव्याने स्थलांतरित असेल तर अशा कुटुंबांनी प्रशासनासोबत संपर्क साधून नळ कनेक्शन मागणी करावी, तसेच उरण व्यतिरिक्त जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यात ज्या कुटुंबाला वैयक्तिक नळ कनेक्शन नाही त्या कुटुंबांना नळ कनेक्शन देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

उरण तालुका नळ कनेक्शन दृष्टिक्षेप

एकूण कुटुंबे : 36108
एप्रिल 2020पूर्वी नळ कनेक्शन असलेली कुटुंबे : 26962
2020-21 मधील उद्दिष्ट : 3841
2020-21 मध्ये नव्याने जोडलेले नळ कनेक्शन : 9146
एकूण टक्केवारी : 238.10

जिल्ह्यात तालुक्यानुसार कुटुंबाकडे असलेली नळ कनेक्शन (टक्केवारी)

उरण : 100
म्हसळा : 88.40
खालापूर : 78.27
पनवेल : 78.77
कर्जत : 60.05
माणगाव : 74.57
रोहा : 68.37
महाड : 69.55
पोलादपूर : 65.86
मुरुड : 56.17
अलिबाग : 56.92
श्रीवर्धन : 86.85
तळा : 63.03
सुधागड : 49.62
पेण : 44.87
एकूण : 68.79

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.