Press "Enter" to skip to content

नशा मुक्ती केंद्राचे गौडबंगाल काय ?

नशा मुक्ती केंद्रावर संशयाची सुई : सखोल चौकशी करणे ही काळाची गरज

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

नशा मुक्ती केंद्र हे नाव ऐकल्यावर किंवा वाचल्यावर मनात अशी भावना निर्माण होते की येथे काहीतरी समाजोपयोगी काम चालत असेल.परंतु सगळीच नशा मुक्ती केंद्रे सेवाभावी वृत्तीने चालतात असे नाही.नाव जरी नशा मुक्तीचे असेल तरी त्याच्या आड अनेक गोरख धंदे सुरू असतात.त्यामुळे पनवेल तालुक्यातील आणि महानगरपालिका हद्दीतील नशामुक्ती केंद्रांची सखोल चौकशी करणे ही,काळाची गरज बनली आहे.

नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना नाशामुक्ती केंद्रात भरती करतात.त्यापोटी त्यांच्याकडून उपचाराची फी घेतली जाते.कित्येकदा नशेच्या साठी अमली पदार्थ,दारू,तंबाखू यांचे सेवन करणाऱ्या लोकांचा यात समावेश असतो.अतिरिक्त सेवन करणाऱ्यांना बऱ्याच वेळा मात्रा कमी करत करत बरे करावे लागते,त्यामुळे अशी केंद्रे नशेचे साहित्य बाळगून असतात.त्याची केंद्रांना अनुमती देखील असते,परंतु काही केंद्रे मात्र याचा फायदा उठवत अमली पदार्थांचा व्यापार करतात.

काही नशामुक्ती केंद्रे रेव्ह पार्ट्यांना माल पुरवत असल्याचा संशय देखील आहे.पनवेलच्या ग्रामीण विभागात कित्येक सेलिब्रिटी लोकांची फार्म हाऊस आहेत.नशा मुक्ती केंद्रे आणि अशा फार्म हाऊस चे साटे लोटे असते.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने नशा मुक्ती अभियान हाती घेतले आहे.या अभियानाच्या अंतर्गत सर्व नशा मुक्ती केंद्रांच्या पासून सुरुवात करण्यात यावी.जेणेकरून या अभियानात ज्यांना खरोखरच नशेच्या विळख्यातून सुटका करून घ्यायची आहे त्यांना योग्य केंद्रात भरती करता येईल.जी केंद्रे दोषी आढळतील त्यांच्या मुसक्या बांधणे हे देखील अभियानाचे ध्येय ठेवावे लागेल.

पनवेल परिसरातील अशाच एका नशा मुक्ती केंद्र मध्ये खून झाल्याची घटना घडली आहे. गरज नसताना काही रुग्णांना डांबून ठेवल्याच्या घटना वारंवार आपल्यासमोर येत असतात. नशेच्या आहारी गेलेल्या कित्येक रुग्णांना बरं करताना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा लागतात या वैद्यकीय सेवा अशा नशा मुक्ति केंद्र मध्ये उपलब्ध नसतात. परिणामी रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे.या साऱ्या पार्श्वभूमीवर नशा मुक्ती केंद्र यांची सखोल चौकशी करणे ही काळाची गरज बनली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.