Press "Enter" to skip to content

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा आंबट शौकीनांना निर्वाणीचा इशारा

लेडीज बारचे ग्राहक आणि बारबाला यांची कोव्हीड टेस्ट करण्याची मागणी

खबरदार…जर लेडीज बार ची पायरी चढाल ! गुलाब देऊन होईल स्वागत

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

कित्येक संसार देशोधडीला लावल्यानंतर देखील आजही लेडीज बार नामक गोरखधंदा बिनबोभाट सुरू आहे. याच धंद्याच्या व्यासपीठावर हजेरी लावल्यानंतर हजारो तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलले जाते. सुदृढ समाजव्यवस्थेला लागलेली कीड म्हणजे रात्रीच्या अंधारात दणदणाट करत असणारे हे लेडीज बार पुन्हा सुरु झाले आहेत. वास्तविक पाहता कोरोना विषाणू मुळे सारे जग थांबले असताना लेडीज बार देखील बंद झाले होते. परंतु जसे विद्यमान सरकारला वाईन शॉप उघडायची घाई झाली होती त्याहीपेक्षा जास्त घाई पुन्हा एकदा लेडीज बार नामक भस्मासूर सुरू करण्यासाठी झाली आहे.

ज्या गोष्टीची समाजाला अजिबात आवश्यकता नाही, जी गोष्ट अत्यावश्यक सेवेमध्ये चुकून सुद्धा येत नाही, असल्या गोरख धंद्यांना पुन्हा एकदा सुरू करण्यात काही नराधम यशस्वी झाले आहेत. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने पुन्हा जर लेडीज बार सुरू झाले तर येणाऱ्या आंबटशौकीन गिऱ्हाइकांची गुलाब पुष्प देऊन स्वागत करू असा इशारा दिला होता. सदर इशार्‍याची प्रशासकीय पातळीवरून गांभीर्याने दखल घेतली नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.

संघर्ष समितीच्या इशाऱ्याकडे नजरअंदाज करून आज लेडीज बार धंद्यांना सुरू करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे. असे असले तरी देखील सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये या प्रामाणिक आणि उदात्त हेतूने पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती लेडीज बार मध्ये येणाऱ्या आंबट शौकीन गिऱ्हाइकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करणार आहे. कोरोनाविषाणूचे संकट अद्यापही आपल्या डोक्यावरती घोंगावत आहे.

प्रत्येक गर्दी होणाऱ्या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने निर्बंध टाकण्यात येत आहेत. इतकेच काय तर लग्न समारंभात देखील केवळ 50 लोकांनाच सहभागी होण्याची अनुमती आहे. मेल्या जीवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील अवघे वीस लोक स्मशानात जाऊ शकतात. असे असताना जर लेडीज बारमध्ये शेकडो लोक जमा होणार असतील तर त्या सगळ्यांची कोव्हीड टेस्ट झालीच पाहिजे, ही भूमिका पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने घेतली आहे. परराज्यातून प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर जर कोरोना टेस्टची बंदी केली जाते तर लेडीज बार मध्ये येणाऱ्या बारबाला आणि ग्राहकांवर देखील टेस्टची बंदी केली पाहिजे अशी खणखणीत भूमिका पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने मांडली आहे.

कोरोना टेस्टमुळे बारमध्ये नाचणाऱ्या बार बालांची आधार कार्ड तपासली जातील, अर्थातच त्यामुळे बांगलादेश सारख्या प्रतिबंधित देशातून येणाऱ्या बारबालांवर अंकुश देखील ठेवता येईल. त्यामुळे लेडीज बार सुरू करायची खाज प्रशासनाला असेल तर सर्वप्रथम लेडीज बार मधील नाचणाऱ्या मुलींची टेस्ट करा अशी आग्रही भूमिका तालुका पत्रकार संघर्ष समितीची राहणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.