आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा
शासनाकडून ५ कोटींचा निधी तर जेएनपीटी व ओएनजीचा निधी वापरण्यात येणार
सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
कोविड हॉस्पिटलच्या उदघाटना नंतर आता गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य शासनाने ५ कोटींचा निधी देण्याचे मान्य केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या उरणच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्नात जातीने लक्ष घालून तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू करून आज बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना याप्रकरणी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी भेट घेऊन यावर चर्चा करून हा प्रश्न निकाली काढण्याचे ठरविले.
या बैठकीत उरणच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी राज्य शासनाकडून ५ कोटींची निधी देण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मान्य केले आहे. सिडकोकडून कायदेशीर बाबी पूर्ण करून जेएनपीटी व ओएनजीसी कडून निधी उपलब्ध करून उरणमध्ये लवकरच सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभे करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे उरणमधील उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याने उरणकरांत समाधान व्यक्त केले जात आहे. उपजिल्हा रुग्णालय उभे राहिल्यानंतर एखादी दुर्घटना झाल्यानंतर जखमींना वेळीच उपचार मिळून त्यांचे जीव वाचण्यास नक्कीच मदत होईल अशी चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.
Be First to Comment