Press "Enter" to skip to content

सर्वच मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करण्याचे मंदिर विश्‍वस्तांना आवाहन

मंदिरातील वस्त्रसंहिता ही नग्नतेशी नव्हे, तर धर्मशास्त्राशी संबंधित ! – हिंदु जनजागृती समिती

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने नुकतेच भाविकांना भारतीय संस्कृतीनुसार आणि सभ्यतापूर्ण वस्त्र परिधान करण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारे केवळ साई संस्थाननेच नव्हे, तर देशभरातील अनेक मंदिरांमध्ये, तसेच गोव्यातील चर्चमध्ये वस्त्रसंहिता (ड्रेस-कोड) लागू करण्यात आलेली आहे.

मंदिरांमध्ये लागू करण्यात आलेली वस्त्रसंहिता ही नग्नतेशी संबंधित नसून ती धर्मशास्त्रांशी संबंधित आहे. केवळ मंदिरच नव्हे, विविध क्षेत्रांमध्ये वस्त्रे कोणती घालावीत, याचे काही नियम ठरलेले आहे. त्या ठिकाणी ‘असेच वस्त्र का ?’, असे कोणी विचारत नाही; मात्र हिंदु देवस्थानांनी असे आवाहन केले की, लगेच अन्याय झाल्याची अभ्यासहीन ओरड केली जाते. मंदिरात श्रद्धेने येणारे भक्त आणि धर्मपरंपरा यांचे पालन करणारे भाविक या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत याचे आनंदाने पालन आणि स्वागतच करतील, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे. तसेच साई संस्थानप्रमाणेच सर्वच मंदिरांत भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू करावी, असे आवाहनही सर्व मंदिर विश्‍वस्तांना श्री. घनवट यांनी केले.

मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात, अशी अत्यंत अभ्यासहीन टीका करणारे तथाकथित पुरोगामी संस्थानने काय आवाहन केले आहे, हे पण नीट वाचत नाहीत. संस्थानने कोठेही तोकडे कपड्यांचा उल्लेख केला नाही, पुरूष-महिला असा उल्लेख केला नाही, तरी अनेक दिवस प्रसिद्धी न मिळाल्याने केलेला हा 'पब्लिसिटी स्टंट' आहे. संस्थानने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. सोवळे-उपरणे घालणार्‍या पुजार्‍यांना अर्धनग्न म्हणणे, ही बौद्धिक दिवाळखोरीच आहे.

पोलिसांचा खाकी गणवेश, डॉक्टरांचा पांढरा कोट, वकीलांचा काळा कोट हे धर्मनिरपेक्ष शासनानेच योजलेले 'ड्रेसकोड' चालतात; मात्र मंदिरात केवळ संस्कृतीप्रधान वस्त्र घालण्याचे केवळ आवाहनही चालत नाही. हा पुरोगाम्यांचा भारतीय संस्कृतीद्वेषच आहे. संभाजीनगर मधील श्री घृष्णेश्‍वर ज्योतिर्लिंगाच्या देवस्थानात सर्वच पुरुषांना कमरेच्यावर वस्त्र न घालण्याचा नियम आहे. तो महिलांना मुळीच नाही. येथे धर्मशास्त्रात महिलांच्या लज्जारक्षणाचा विचार केलेला आहे; मात्र हे समजून घेण्याची इच्छाच ज्यांना नाही, त्यांना काय सांगणार ? पांढरा पायघोळ झगा घालणार्‍या ख्रिस्ती पाद्रीवर, तोकडा पायजामा घालणार्‍या मौलवीवर वा मुस्लिम महिलांनी काळा बुरखा घालण्याच्या पद्धतीवर टीका करण्याची हिंमत पुरोगाम्यांमध्ये आहे का, असा प्रश्‍नही घनवट यांनी उपस्थित केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.