Press "Enter" to skip to content

शेकापक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी सरकारला ठणकावले

शेतकरी कामगारांच्या हक्कासाठी शेकापक्ष शेवटपर्यंत लढा देणार
आ. जयंत पाटील यांचा इशारा :
शेकापक्षाच्या एल्गारने अलिबाग दणाणले 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । विशेष प्रतिनिधी । 🔶🔶🔷🔷


शेतकरी कामगार आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी शेतकरी कामगार पक्ष पुन्हा एकदा मैदानात आक्रमक उतरुन लढा देईल. कृषी व कामगार कायदा मंजूर करून देशातील शेतकरी, कामगारांना देशोधडीला लावण्याचा डाव केंद्र सरकारने आखला आहे. शेतकरी व कामगारांच्या विरोधातील कायदा रद्द करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष शेवटच्या क्षणापर्यंत लढा देईल असा इशारा शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिला.

कृषी व कामगार कायद्याबाबत तसेच अन्य मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकापक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या यल्गार मोर्चात अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार पंडितशेट पाटील, माजी आमदार धैर्यशिल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राज्याचे कार्यालयीन चिटणीस राजेंद्र कोरडे,  जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, पनवेल मनपाचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, सुरेश खैरे, महिला आघाडीच्या नेत्या नगरसेविका चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे अध्यक्ष नृपाल पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य, तालुका चिटणीस, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार जयंत पाटील म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी, कामगार व सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या विरोधातील कायदे लागू करून त्यांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरु आहे. रायगड जिल्हयात प्रकल्पांच्या नावांनी शेतकर्‍यांच्या जमीनी कवडीमोल भावाने घेण्याचा डाव सुरु झाला आहे.

जिल्हयातील शेतकरी यामुळे देशोधडीला लागणार आहे. कोरोनाचे संकट असताना, चक्री वादळामुळे जिल्हयातील शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह, कामगार, व जिल्हयातील जनता मोठ्या आर्थिक संकटात सापडली. याच काळात विद्यूत वितरण कंपनीने भरमसाठ विज बिल आकारून जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. लाईट बिल भरण्याचा तगादा लावणार्‍या विद्यूत वितरण कंपनीचा बंदोबस्त करायला पाहिजे. सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करून कामगारांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहेत. जनतेला खोटी आश्‍वासने देऊन निवडणूक लढविणार्‍यांना वाटले, शेतकरी कामगार पक्ष संपला आहे.शेकापसोबत खुलेआम लढण्याची ज्यांची हिंमत नाही, ते आतून, छूप्या पध्दतीने तसेच टेबला खालून युत्या आघाडी करून शेकाप सोबत लढण्याचा प्रयत्न करीत आहेत. या जिल्हयात गोरगरीबांना, शेतकरी, कामगारांना अधार देणारा शेतकरी कामगार पक्षच आहे, हे आपण जनतेला दाखवून दिले पाहिजे, असे आमदार जयंत पाटील म्हणाले.

माजी आमदार धैर्यशिल पाटील यांनी आपल्या आक्रमक शैलीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, संविधानाने दिलेले सर्व अधिकार हे सरकार हिरावून घेऊ पाहत आहे. कोव्हीड काळातही सर्वसामान्य भरडला गेला आहे. अंबानी अदानी सारखे उद्योगपती आणखी श्रीमंत झाले तर गरीब आणखी गरीब झाले. निसर्ग चक्रीवादळात बागायतदार शेतकरी उध्वस्त झाला. सरकारने मात्र तुटपूंजी नुकसानभरपाई मदत देऊन आणखी चेष्टा करण्याचे काम केले. निवडणूका येतील जातील प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही. पण आपल्याला लढा कायम ठेवावे लागेल हे लक्षात ठेवा. वेळ पडली तर झेंडा खाली घेऊन दांडा हातात घेऊन लढण्याची तयारी ठेवा असेही त्यांनी शेवटी बजावले.

अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ अशोक ढवळे यांनी आपल्या भाषणात शेकापक्षाच्या लढाऊ बाण्याचे कौतुक केले. मोदी सरकारच्या आरोग्य सेवेसारख्या सेवांचे खाजगी करण करण्याच्या धोरणामुळेच कोरोना वाढल्याचा आरोप त्यांनी केला. 8 महिन्यात बेरोजगार झालेल्या 15 कोटी बेरोजगारांना नोकरी देण्याचा एकही शब्द सरकार काढत नाही. 9 महिन्यात कोरोनापेक्षा भुकबळीने जास्त बळी गेले असतील असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. त्यात शेतकरी आणि कामगारांना उध्वस्त करणारे दोन विधेयक आणून जखमेवर मिठ चोळण्याचे कामही याच सरकारने केले. कामगारांना गुलाम बनवणारे कायदेच या सरकारने बनवले आहेत. आजच्या प्रचंड गर्दीमुळे भविष्यात येणार्‍या विधानसभा, जिल्हा परिषद नगरपरिषद ग्रामपंचायत अशा सर्वच निवडणूकांमध्ये शेकापक्षाचाच लाल बावटा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्‍वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.