Press "Enter" to skip to content

सिडकोच्या मलनिस्सारण प्रकल्पाला फुंडे ग्रामस्थांचा विरोध

जनसुनावणी न घेता प्रकल्पाला सुरुवात 🔶🔶🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔶🔷

सिडकोने द्रोणागिरी नोडमधील मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यास फुडें ग्रामपंचायत परिसरात सुरुवात केल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे याबाबत कोणतीही जनसुनावणी तर झालीच नाही तसेच ग्रामपंचायतीने याबाबत कोणत्याही प्रकारची लेखी हरकत घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र या प्रकल्पाचा त्रास येथील परिसरातील नागरिकांना सहन करावा लागण्याची शक्यता नासकारता येत नाही.

याबाबत आज फुंडे ग्रामपंचायत कार्यालयात सभापती सागर कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंस सदस्य दीपक ठाकूर, गटविकास अधिकारी नीलम गाडे, अंजने, ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी पालव, ग्रामसेवक राजेंद्र सांतग, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ व सिडको अधिकारी उपस्थित होते.

मात्र जबाबदार अधिकारी नसल्या कारणाने ठोस निर्णय न होता ही बैठक पुन्हा येत्या १ डिसेंबर रोजी ११ वाजता घेण्याचे ठरले आहे.

सिडकोच्या माध्यमातून उरण परिसरात द्रोणागिरी नोडच्या नावाने मोठी वसाहत उभी रहात आहे. या नोडच्या मलनिस्सारण प्रकल्प नोडच्या बाजूलाच असलेल्या समुद्राजवळ उभारण्याऐवजी हा कोट्यावधीचा प्रकल्प फुंडे ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यास सुरुवात केली आहे. याला ग्रामस्थांचा विरोध आहे. या परिसरात वीज प्रकल्पाची कॉलनी आहे. तसेच भविष्यात इंजिनिअरिंग कॉलेज व सुसज्ज हॉस्पिटल उभे रहाणार याचा सिडको प्रशासनाने कोणताही विचार केलेला दिसत नाही.

कोणताही मोठा प्रकल्प सुरू करण्याच्या आधी जनसुनावणी होऊन येणाऱ्या हरकतींचा विचार करणे गरजेचे असतानाही याला बगल देत मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू केला असल्याचे सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच येथील ग्रामस्थांचे उपजीविकेचे साधन असलेले मासेमारी व्यवसाय व इतर समस्यांचा सामना या परिसरात राहणाऱ्यांना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याला विरोध करण्यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी आमची गेली वर्षांपासून सिडकोकडून फसवणूक होत असून अनेक प्रश्न आजही प्रलंबित असल्याचे सांगत या प्रकल्पामुळे आमचे जीवन उध्वस्त होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ग्रामसेवक राजेंद्र सांतग यांच्याकडे ग्रामपंचायतीने याला विरोध केला आहे किंवा लेखी हरकत घेतली आहे का याची विचारणा केली असता नाही असे सांगत आम्हांला कोणतीच कल्पना सिडको देत नसल्याचे सांगितले. तसेच या प्रकल्पाच्या ठेकेदारांनी गावाला निधी दिला असून तो किती हे मात्र पत्रकारांना सांगितले नाही. मात्र आजच्या बैठकीत सक्षम सिडको अधिकारी उपस्थित नसल्या कारणाने सदरची बैठक पुन्हा येत्या १ डिसेंबर रोजी घेण्याचे ठरले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.