Press "Enter" to skip to content

यंदाची दिवाळी कधीही विसरता न येणारी…

यंदाची दिवाळी कधीही विसरता न येणारी…

यंदाची दिवाळी माझ्या साठी आणि आमच्या सिटी बेल वृत्तसमुहासाठी खरंच कधीही विसरता येणार नाही! अशी ठरली.वास्तविक पाहता यंदाच्या दिवाळी सकट सगळ्याच सणांवर covid 19 व्हायरस आणि त्यामुळे लादलेल्या टाळेबंदी चे सावट होते.या संघर्षमय परिस्थितीत सुद्धा आमच्या वृत्तसमुहाने इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्याचे शिवधनुष्य उचलले आणि पेलले सुद्धा.दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आमचे इंग्रजी प्रकाशन वाचकांच्या सेवेत रुजू करू शकलो याचा अभिमान आहेच,परंतु यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाची ठरली कारण यावर्षी दिवाळी साजरी केली ती एका निराधारांच्या वृद्धाश्रमात! हा अविस्मरणीय अनुभव दिल्याबद्दल करूणेश्र्वर वृद्धाश्रम , राविशेठ पाटील, केअर ऑफ नेचर चे सर्वेसर्वा राजू मुंबईकर यांचे शतशः आभार.
     प्रथम अंक प्रकाशन सोहळा साजरा करण्यावर कोविड प्रतिबंधक नियमांचे बंधन होते.त्यामुळे पारंपरिक पद्धतीने सभागृह छाप सोहळा करण्यापेक्षा मान्यवरांच्या घरी जाऊन व्यक्तिशः प्रकाशन करण्याचे अस्मादिकांनी ठरविले..अर्थात सामाजिक अंतर राखण्याचे सारे नियम पाळून!याच प्रयत्नात श्री साई देवस्थान वहाळ,चे संस्थापक अध्यक्ष तथा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी उपाध्यक्ष रवीशेठ पाटील यांना फोन केला.वृद्धाश्रमात अंक प्रकाशन करण्याची आणि त्या तमाम निराधार वृद्धांचे समवेत दिवाळी साजरी करण्याची कल्पना त्यांनीच सुचविली.त्यांच्या सोबत केअर ऑफ नेचर या संस्थेचे माध्यमातून पर्यावरण संतुलनासाठी अक्षरशः स्वतःला वाहून घेतलेले राजू मुंबईकर हे सुद्धा होते. या दोन्ही व्यक्तीमत्वांमधला एक गुण  मला प्रचंड भावतो. एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती पूर्णत्वाला नेईपर्यंत ही दोन्ही व्यक्तिमत्वे अक्षरशः तहानभूक हरपून काम करतात. नियोजनाच्या बाबतीत तर मी त्यांना मास्टर माईंड ही पदवी बहाल करीन.
वृद्धाश्रमात पोहोचल्यावर एका अनोख्या विश्वात प्रवेश केल्याचा फिल आला.तिथल्या प्रत्येकाच्या तिथे असण्यापाठी एक करुण कहाणी असली तरी आताशा वास्तव स्विकारलेले चेहरे आमचे स्वागत करत होते.असे असून सुद्धा त्यांच्या चेहेऱ्यावर समाधान होते,वृद्धाश्रम संचालकांच्या ओतप्रोत काळजी घेण्याच्या कामाची ती पावती होती.मुद्दाम कोणाचीही नावे विचारण्याचा आगाऊ पणा केला नाही.न जाणो आपल्याच कुणा परीचिताचे आई वडील निघायचे.खरे म्हणजे अपत्यांना जन्मदाते इतके कसे काय नकोसे होतात? या विचाराने उद्विग्न केले.संचलकांनी सांगितले इथे आणून सोडल्यावर कित्येक जण ढुंकून सुद्धा पहात नाही.कित्येक नव प्रवेशकर्ते मुले संपर्क ठेवतील,भेटायला येतील या आशेवर जगत असतात.तिथल्या कित्येक डोळ्यांच्या डोहात ती प्रतिक्षा दिसत होती.
आमच्या इंग्रजी आवृत्ती प्रकाशनानंतर या विभागातील हे पहिलेच इंग्रजी वृत्तपत्र असल्याचे समजताच अनेक ज्येष्ठांनी डोक्यावर मायेचा हात फिरवत पोटभर आशिर्वाद दिले.कित्येकांनी यापाठची आमची भूमिका अगदी प्रश्नांचा भडीमार करून जाणून घेतली. राविशेठनी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.व्यासपीठाच्या साऱ्या नियमांना गुंडाळून ते दिलखुलास पणे मंचावरून उठून प्रेक्षकांच्या मध्ये बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी बहारदार गाण्यांचा मनमुराद आनंद लुटला. त्यांना सुद्धा वयाचा विसर पडला आणि त्यांची पावले गाण्याच्या ठेक्यावर थिरकत राहिली.मी आणि रवीशेठ स्वतःला थांबवू शकलो नाही.दोन मिनिटांच्या त्या नाचण्याने दिवाळीचा आनंद सहस्त्र गुणीत केला…वृद्धश्रमातून निघताना दरवर्षी इथे यायचेच याची खूणगाठ मनाशी पक्की बांधली.
करूणेश्र्वर वृद्धाश्रम , राविशे ठ पाटील,राजू मुंबईकर तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक अतुलनीय दिवाळी गिफ्ट दिल्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत.
म्हणूनच म्हणतो यंदाची दिवाळी कधीही विसरता न येणारी…

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.