Press "Enter" to skip to content

पर्यटकांमध्ये समाधान : माथेरान मिनिट्रेनची शटल सेवा सुरू

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔷🔶🔷

माथेरान करांसह पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन सेवा आजपासून दि. ४ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी लॉक डाऊन मध्ये ही ट्रेन जवळपास आठ महिने बंद करण्यात आली होती. त्यामुळे नुकताच २ सप्टेंबर पासून माथेरान अनलॉक केल्याने इथे पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे.

दस्तुरी पासून गावात येण्यासाठी तीन किलोमीटर पायपीट करावी लागत होती. याकामी निदान मिनिट्रेनची अमन लॉज ते माथेरान स्टेशन दरम्यान शटल सेवा उपलब्ध व्हावी अशी मागणी स्थानिकांमधून सातत्याने पुढे येत होती.नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी याबाबतीत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला होता तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन लवकरच शटल सेवा सुरू करावी असे गार्हाणे मांडले होते त्यानुसार अखेरीस रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन शटल सेवा सुरू करण्यात आली आहे.

पहिल्याच दिवशी या फेरीत १७ प्रौढ तर ७ मुले अशा एकूण चोवीस पर्यटकांनी प्रवास केला आहे.सध्या या मार्गावर शटलच्या दोन फेऱ्या होणार असून माथेरान स्टेशन मधून सकाळी ०९-३० आणि संध्याकाळी ०४-०० वाजता सुटेल तर अमन लॉज स्टेशन वरून सकाळी ०९-५५ आणि संध्याकाळी ०४-२५ वाजता सुटणार आहे. जरी शटलच्या दोन फेऱ्या कार्यान्वित असल्या तरी आगामी सुट्टयांच्या हंगामात नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या मागणीनुसार या फेऱ्या वाढण्याची शक्यता आहे असे रेल्वेच्या अधिकृत सूत्रांकडून समजले आहे.

जवळजवळ सात ते आठ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही शटल सेवा सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे निश्चितच पर्यटनाला चालना प्राप्त होऊन इथले पर्यटन बहरणार आहे. या ट्रेनमुळे स्थानिकांसह पर्यटकांना लाभ मिळणार असून ही सेवा अविरतपणे सुरू राहावी यासाठी रेल्वेच्या संबंधित अधिकारी तसेच कर्मचारी वर्गाने प्रयत्न करावेत.

प्रेरणा सावंत
नगराध्यक्षा माथेरान
आज पहिल्यांदाच आम्ही या ट्रेनमधून प्रवास केला आहे.यापूर्वी सुध्दा आम्ही नेहमीच इथे आवर्जून भेट देत होतो. आमचे संपूर्ण कुटुंबाने या सफरीचा मनमुराद आनंद घेतला आहे. आमच्या वेळेची बचत तसेच दस्तुरी पासून जो काही अवाढव्य वाहतुकीसाठी खर्च होणार होता त्याची सुध्दा बचत झाली आहे ट्रेन सुरू झाली यामुळे आम्ही खूपच आनंदी आहोत.

मोहसीन शेख - पर्यटक,मुंबई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.