Press "Enter" to skip to content

कोकणातील सह्याद्री पर्वताच्या पट्ट्यात पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ दाखल

मेंढपाळांना जगवतेय शेतातील कारवणी पद्धत : बिबट्याच्या हल्याची मेंढपाळांना सतावतोय भीती 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

कोकणात पर्जन्यवृष्टी चे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मान्सूनचा पाऊस सुरू होताच कोकणातील  मेंढपाळ परतीच्या प्रवासाला लागतात. मात्र पावसाचा जोर कमी होताच साधारणतः ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ कोकणातील सह्याद्री पर्वताच्या पट्ट्यात दाखल होताना दिसतात.

आज सर्वत्र मेंढपाळ व त्यांचे तांडे नजरेस पडत आहेत. पाली खोपोली राज्य महामार्ग, पेण अलिबाग मार्गे, तसेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आता शेळ्या व मेंढ्यांचे जथ्ये दिसु लागले आहेत. कोकणात पूर्वीपासून चालत आलेली शेतात शेळ्या मेंढ्या बसविण्याची कारवणी पद्धत आजही आपले अस्तित्व टिकवून असल्याचे दिसते. कारवणी पद्धत मेंढ पाळांना जगवतेय हेच खरे. कोकणातील पूर्वपरंपरागत प्रथा आजही जिवंत आहे.

पूर्वमशागतीसाठी पूर्वीच्या काळी रासायनिक खते नसल्याने शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेतीची मशागत करत असत. अशातच हिवाळ्यात मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्यांचा मोठा फौजफाटा घेऊन आल्यावर या भटकंतीत दिवसा रात्री आपले बिऱ्हाड  एखाद्या शेतात घेऊन बसतात. अशात या शेळ्या मेंढ्याचे मूलमूत्र शेतात पडून शेतीची सुपीकता वाढण्यास मदत होते. ही पद्धत कारवणी पद्धत म्हणून आजही ओळखली जाते.

या लेंडीखताला मोठी मागणी असते. फळबागांना देखील हे खत अधिक उपयुक्त ठरते. शेत जमीन अधिक कसदार होऊन उत्पादनात वाढ व्हावी याकरिता शेतकरी मेंढपाळांना दरवर्षी स्वतःहून बोलवून घेतात. मेंढपाळांना याकरिता प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ऊन, वारा, वादळ, थंडी , पाऊस याची तमा न बाळगता मेंढपाळ आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी व जनावरे वाचविण्यासाठी आटापिटा करताना दिसतो. या भटकंतीत एका मेंढपाळकडे साधारणतः 200 ते 250 मेंढ्या असतात. मेंढपाळांना या कळपासोबत च आपला संसार थाटावा लागतो.अनेकदा वाढत्या आजारात मेंढ्या दगावतात, त्यामुळे कवडीमोल दराने शेळ्या मेंढ्या विकण्याची वेळ धनगर बांधवावर येते.

सर्वच्या सर्व मेंढ्या विकाव्या लागू नयेत म्हणून त्यांच्यावर स्तलांतराची वेळ येते.  या कळपात शिकारी कुत्रे , घोडे, कोंबड्या यांचा देखील समावेश असतो. लहान मुलांना घोड्यावर बसवून ही सवारी थाटात जाताना आता सर्वत्र दिसू लागली आहे.  या मेंढ्या जपणे खूप मोठ्या जबाबदारीचे काम असते. महामार्गावरून वेगवान वाहनांच्या धडकेत कळपातील अनेक शेळ्या मेंढ्या मृत्युमुखी पडत असतात. पाऊस पडेपर्यंत मेंढपाळ भटकंती करत असतात. त्यामुळे शेळ्या मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागतो असे यावेळी बोलताना मेंढपाळाने सांगितले. कारवणी पध्दतीत एका रात्रीसाठी शेळ्या मेंढ्या शेतात बसवल्याने शेतकर्यांकडून तांदूळ व पैसे बिदागी म्हणून दिली जाते.

यातून मेंढपाळ आपला उदरनिर्वाह साधत असतो. पोटाची खळगी भरण्यासाठी धावणाऱ्या या मेंढपाळांचे जीवन हलाखीचे व कष्टप्रद असतेच, शिवाय या भटकंतीत त्यांच्या लहान लहान चिमुरड्यांना शिक्षण मिळत नसल्याने त्यांचे भवितव्य अंधारमय होते हे देखील तितकेच खरे. सरकारने मेंढपाळ यांना विविध योजनांचा लाभ द्यावा, त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी विशेष तरतूद करावी अशी मागणी होताना दिसत आहे.

मेंढपाळांना सतावतोय बिबट्याची भीती

पश्चिम महाराष्ट्र व घाटमाथ्यावर गुरांच्या  चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने मेंढपाळ कोकणात दाखल होतात. अशातच जंगलरान व माळरान पठारावर मेंढ्या चरण्यासाठी गेल्यावर बिबटे मेंढया फस्त करतात. कोकणात आता भरवस्तीत बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाला आहे. त्यामुळे जनावरांना व नागरीकांना बिबट्याचे भय वाटू लागले आहे. उघड्यावर असणाऱ्या शेळ्या मेंढ्याचा बचाव करण्याचे आवाहन उभे ठाकले आहे. तसेच जंगलातील वनव्यांचा देखील मेंढ्यांच्या कळपाला धोका जाणवत असल्याचे मेंढपालांनी सांगितले. 

पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ आता पालीसह जिल्ह्यात दाखल झाले आहेत. शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी शेळ्या मेंढ्यांचे मलमूत्र उपयुक्त ठरते, उत्पादनातही मोठी वाढ होते. त्यामुळे आम्ही शेतकरी किमान एक दोन दिवस आमच्या शेतात मुक्काम करण्यास सांगतो. त्याबदल्यात त्यांना तांदूळ अथवा पैसे देतो. 

र. य. पाटील, शेतकरी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.