Press "Enter" to skip to content

जागतिक स्ट्रोक दिवस -२९ ऑक्टोबर २०२०

भारतात चक्कर आल्यावर चप्पल अथवा कांदा नाकाला लावण्याच्या प्रथेमुळे मेंदूच्या विकारांवर होत आहे दुर्लक्ष ! 🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह । आरोग्य प्रतिनिधी । 🔶🔷🔶

२९ ऑक्टोबर  हा दिवस जागतिक पक्षाघात दिन म्हणून साजरा  होतो हा दिवस पक्षाघात किंवा ब्रेन अटॅक ह्या गंभीर आजाराची माहिती जनसामान्यांना व्हावी व या आजाराची कारणे व उपचाराची जागरुकता व्हावी म्हणून साजरा केला जातो. ब्रेन अटॅक हा गंभीर आजार आहे व तो कोणालाही होऊ शकतो. भारतामध्ये प्रत्येक मिनिटाला ६ व्यक्ती पक्षाघाताच्या आजाराला बळी पडतात अशी माहिती उपलब्ध आहे परंतु भारतामध्ये विविध आजारांचे एकत्रित संकलन नसल्यामुळे हा आकडा जास्त असू शकतो, याच सोबतच सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे  आजही एखाद्या व्यक्तीला चक्कर आली तर त्या व्यक्तीच्या नाकाजवळ चप्पल अथवा कांदा नेला जातो यामुळे त्या व्यक्तीला असलेल्या गंभीर आजारावर सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

वारंवार चक्कर येत असेल तर चक्कर कशा कशामुळे येते व तिच्यावर काय उपचार करणे आवश्‍यक असते याची माहिती असायला हवी. चक्कर कोणत्या कारणामुळे आली हे समजल्या शिवाय तिच्यावर उपचार करण्याचा फायदा होत नाही. विशेषतः ज्येष्ठ वयाच्या व्यक्‍तींना किंवा मधुमेह, रक्‍तदाब, हृदयविकार, अर्धांगवात अशा प्रदीर्घ विकारांचा इतिहास असणाऱ्यांना चक्कर आली तर लागलीच विशेष तपासण्यांचा आधार घेणे आवश्‍यक असते. याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मेंदूविकार तज्ञ डॉ समीर पारेख  सांगतात,”  भारतामध्ये आजही अनेक आजारांबाबत समाजामध्ये भ्रामक कल्पना आहेत व त्यामुळे अनेक रुग्ण हे अंतिम टप्प्यामध्ये हॉस्पिटलमध्ये अथवा डॉक्टरकडे येतात व अशावेळी त्यांच्यावर उपचार करणे फारच कठीण होऊन जाते.

स्ट्रोक म्हणजेच पक्षाघात हे जगातील अपंग होण्याचे पाहिले कारण असून मृत्यूचे तिसरे कारण आहे तरीसुद्धा यावर आपल्याकडे जनजागृतीचा खुपच अभाव आहे. हा आजार कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो, पक्षाघात आल्यावर ३० ते ३५  टक्के नागरिकांचा मृत्यू होतो तर ३० टक्के नागरिकांना अपंगत्व येते असा वैद्यकीय क्षेत्रामध्ये अंदाज आहे.

अनेकवेळा स्ट्रोक आल्यानंतर अनेकजण घरगुती उपचार करण्यात वेळ घालवतात व त्यामुळेच मृत्युदर वाढतो कारण स्ट्रोक आल्यानंतर चार तासाच्या आत उपचार मिळाले तर तो रुग्ण पूर्ववत होऊ शकतो. सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये म्हणजेच मार्च ते ऑगस्ट दरम्यान अनेक नागरिक या आजाराला बळी पडले आहेत. मेंदूला ऑक्सिजन व जीवनसत्वाचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्यात दोष निर्माण झाल्यामुळे पक्षाघाताचा आजार होतो.

आज शहरामध्ये अनेक जेष्ठ नागरिक हे एकटे राहतात. शहरातील बंद फ्लॅट संस्कृतीमुळे अनेक जेष्ठ नागरिक या आजाराचे शिकार होतात कारण त्याना वेळेवर उपचार मिळत नाहीत. या आजाराच्या सुरुवातीला  डोकेदुखी व चक्कर अथवा भोवळ  येते अशावेळी मेंदूविकार तज्ञांचा  सल्ला घेऊन त्वरित उपचार करणे गरजेचे असते. आजमितीला भारतामध्ये मेंदू  विकारांवर अनेक आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध झाली आहे.

भारतामध्ये मेंदूविकाराचे प्रमाण हे वाढत असून दरवर्षी ७ लाख भारतीय नागरिकांचा मृत्यू हा ब्रेनस्ट्रोकमुळे  होतो.”   ब्रेन स्ट्रोक म्हणजेच  पक्षाघाताची अनेक कारणे असू शकतात परंतु  आनुवांशिकता म्हणजेच आई अथवा वडिलांना हा जर असेल तर त्यांच्या मुलांनी खूप दक्षता घेतली पाहिजे तसेच अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, मानसिक ताणतणाव ,व्यायामाचा अभाव सतत मद्यपान व धूम्रपान  करणे या सवयी सुद्धा ब्रेन स्ट्रोक होण्यासाठी कारणीभूत ठरतात अशी माहिती अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मेंदूविकार तज्ञ डॉ समीर पारेख यांनी दिली. स्पर्श न समजणे, बोलताना अडचणी येणे, अंधुक दिसणे, चालताना तोल जाणे, वारंवार चक्कर येणे,चेहऱा वाकडा होणे,डोकेदुखी ही ब्रेन स्ट्रोकची लक्षणं आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.