Press "Enter" to skip to content

डॉ.रविंद्र इनामदार यांच्या घरात चोरी करणारे गजाआड

82 लाख रुपयांच्या घरफोडी प्रकरणात 5 नेपाळी सुरक्षारक्षकांना अटक :  नेपाळमध्ये पळून गेलेल्या इतर 3 आरोपींचापोलिसांकडून शोध सुरु 🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 🔶🔷🔶

नवीन पनवेल सेक्टर-19 मधील डॉ.रविंद्र इनामदार यांच्या घरात तब्बल 82 लाख रुपयांची घरफोडी करणार्‍या टोळीतील 5 नेपाळी सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात खांदेश्‍वर पोलिसांना यश आले आहे. या घरफोडीच्या गुह्यात सहभागी असलेले 3 सुरक्षा रक्षक नेपाळ येथे पळून गेल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नवीन पनवेल सेक्टर-19 मध्ये डॉ.रविंद्र इनामदार यांचे श्रेयस हॉस्पीटल असून या हॉस्पीटलच्या तिसऱया व चौथ्या मजल्यावर डॉक्टर आपल्या कुटुंबासह रहाण्यास आहेत. डॉ.इनामदार हे प्रत्येक शनिवार रविवारी कुटुंबासह पुणे येथील आपल्या गावी जात असतात. गत 3 ऑक्टोबर रोजी सुद्धा ते आपल्या गावी गेले होते. याचीच संधी साधुन चोरट्यांनी जिन्याद्वारे   डॉ.इनामदार यांच्या चौथ्या मजल्यावरील घरातून 3 किलो वजनाचे 30 सोन्याचे बिस्कीट, 20 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 2 लाख रुपयांचे घड्याळ असा तब्बल 82 लाखांचा ऐवज चोरुन नेला होता.

दुसर्‍या दिवशी सकाळी डॉक्टर घरी परतल्यानंतर घरफोडीचा हा प्रकार उघडकिस आला होता. या घटनेनंतर खांदेश्‍वर पोलिसांसह गुन्हे शाखेने या घटनेच्या तपासाला सुरुवात केली होती. मात्र, हॉस्पीटलमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळुन आल्याने पोलिसांनी त्याठिकाणी कामास असलेल्या सगळ्यांची चौकशी सुरु केली. या तपासादरम्यान, त्या ठिकाणी काम करणारा एक नेपाळी सुरक्षारक्षक गायब असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी संशयावरुन त्याचा माग काढला असता, त्याने इतर नेपाळी सहकाऱयांच्या मदतीने डॉक्टरच्या घरातील 82 लाखांचा ऐवज चोरुन नेल्याचे आढळुन आले. त्यानुसार पोलिसांनी उत्तरप्रदेश, मुंबई व कळंबोली भागातुन या घरफोडीच्या गुह्यात सहभागी असलेल्या 5 नेपाळी आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून काही ऐवज हस्तगत केला आहे. या गुह्यात सहभागी असलेले तीन सुरक्षारक्षक घरफोडीतील मोठा ऐवज घेऊन नेपाळ येथे पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे वेगवेगळे पथक रवाना झाले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.